आरोग्य यंत्रणा कोलमडली : आ. पृथ्वीराज चव्हाण कराडच्या सरकारी रूग्णालयात थेट ICU मध्ये

कराड | काॅंग्रेसचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील अनेक अडचणींचा आढावा घेत पाहणी केली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट गोरगरिंबासाठी चालणाऱ्या या रूग्णालयातील आयसीयू वाॅर्डमध्ये जावून पाहणी केली. तसेच उपलब्ध वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती घेतली. कराडसारख्या मोठ्या शहरात गेल्या दीड वर्षापासून वैद्यकीय अधीक्षक हे पद रिक्त असल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच शासनाची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असल्याचे म्हटले.
कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व इतर स्टाफची रिक्त पदे, रुग्णालयातील सुविधा, समस्या या सर्व बाबींचा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. राजेश शेडगे यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, राज्यात जी शासकीय रुग्णालयाची व्यवस्था कोलमडली आहे. त्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. शासकीय रुग्णालयांच्या अवस्थेचा प्रश्न कराडचा तर आहेच. परंतु राज्याचा सुद्धा प्रश्न असाच आहे. रुग्णालयातील डॉक्टरांची पदे भरण्यात शासनाने गलथानपणा केलेला आहे. त्यामुळेच राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. राज्य शासन – केंद्र सरकार काय दोन्ही सरकारची सगळीकडेच कंत्राटी पद्धत अवलंबायचं सुरु आहे. कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातून रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. अशा रुग्णांची पुरेसा स्टाफ व डॉक्टर नसल्याने गैरसोय होत असते. यामुळे जोपर्यंत पूर्णवेळ जबाबदार डॉक्टरांची नेमणूक होत नाही. तोपर्यंत तात्पुरती व्यवस्था किती दिवस अवलंबायची हा प्रश्न अनुत्तरित आहे. रुग्णालयाची इमारत 60 वर्षे जुनी असून या इमारतीची डागडुजी व कालांतराने नवीन इमारत बांधणे अत्यावश्यक आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष झाकीर पठाण, राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, जावेद शेख, शुभम लादे आदी यावेळी उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेताना खालील मुद्दे उपस्थित झाले.
रिक्त डॉक्टरांच्या पदाबाबत मागणी प्रस्ताव सादर करून प्रश्न मार्गी लावावा,
कराड येथील वेणूताची चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडचे रुग्णालय असून सध्या १६४ बेड द्वारे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अजून ५० बेड मंजुरीसाठी अवश्यकता आहे.
प्रस्ताव पाठविण्याबाबत आ. चव्हाण यांनी सूचना केल्या.
१) स्वच्छता सेवा सुरळीतपणे चालण्यासाठी किमान १४ स्वच्छता सेवकांची आवश्यकता आहे.
२) कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे मे-२३ पासून सप्टें २३ अखेर (५ महिन्याचे) वेतन अनुदान प्राप्त नाही.
३) तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे रुग्ण तपासणीमध्ये अडचणी.
४) नियमित डयूटी करण्यांसाठीसुद्वा फक्त ५ वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध आहेत.
५) ३ रुग्णवाहिका आणि फक्त १ च कंत्राटी तत्वावर वाहनचालक उपलब्ध आहे. फक्त सोमवार/मंगळवार करिता पाटण येथील वाहनचलकाची नियुक्ती. त्यामूळे १ वाहन विनावापर पडून आहे. त्यामुळे रुग्ण सेवेत अडथळा निर्माण होतो.
६) रुग्णवाहिके अभावी रुग्णांना (बाळंतपण) ने-आण सुविधा पूर्ण ताकदीने देता येत नाहीत.