हॅलो न्यूजचा दणका : अखेर वीज वितरण जागे झाले अन् निगडीतील प्रश्न सुटला
मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
निगडी (ता. कराड) शिवारातील व गावातील काही ठिकाणचे धोकादायक स्थितीतील गेल्या वर्षभरापासून कललेले विजेचे खांब व लोंबत्या तारा वीज वितरण कंपनीने सरळ केल्या. वीज वितरण कंपनीने एका वर्षापासून तक्रारीची दखलच घेतली जात नव्हती. तक्रारीला कोलदांडाच दाखवला होता. अखेर या संदर्भातील ‘हॅलो न्यूज’ने ‘वीज वितरण कंपनीचा लागेना मेळ… शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ’ अशी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर संबधितांना जाग आली अन् त्यानुसार वीज वितरण कंपनीने तात्काळ दखल घेतली.
निगडी येथील शिवारात व गावात काही ठिकाणी विजेचे खांब एका बाजूस कलले होते. कुठल्याही क्षणी जोरदार वाऱ्याच्या धक्क्याने ते कोसळू शकतात, अशी धोकादायक स्थिती होती. शिवारात शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी दिवसभर वर्दळ असते. रस्त्याच्या कडेलाच खांब असल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर केव्हाही कोसळले असते. या खांबावरच्या विजेच्या ताराही हाताला येतील एवढ्या अंतरावर लोंबत्या स्वरूपात होत्या, हा जीवघेणा प्रकार होता. या धोकादायक खांब व विजेच्या तारा संदर्भात वितरण कंपनीला वर्षभरात अनेकवेळा संपर्क साधला. मात्र, कंपनीने गांभीर्याने तक्रारीची दखल घेतली नव्हती. ‘वीज वितरण कंपनीचा लागेना मेळ… शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ’ अशी एकंदरीत अवस्था असल्याचे वृत्त ‘हॅलो न्यूज’ने प्रसिद्ध केले होते.
शेतकऱ्यांच्या जीवाची कवडीमोल किंमत वितरण कंपनीला नाही. अशीच भावना शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांविषयी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्यामध्ये उमटल्या होत्या. जर धक्कादायक प्रकार घडला तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असल्याचे निगडीचे माजी सरपंच आत्माराम घोलप यांनी इशारा दिला होता. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची विविध तक्रारी संदर्भात मसूरच्या ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा झाली होती. त्यावेळीही माजी सरपंच घोलप यांनी या संदर्भात तक्रार मांडली होती. त्याची वीज वितरण कंपनीने दखल घेत वाकडे विजेचे खांब सरळ करून लोंबत्या ताराही उचलून घेतल्या.