माझ्याकडून अनावधानाने “सैतान” शब्द : सदाभाऊ खोत
सातारा | “माझ्याकडून अनावधानाने “सैतान” हा शब्द गेला आहे. गावगाड्यांमध्ये सैतान हा शब्द सहज वापरला जातो. माझी गावगाड्यातील भाषा इंडियातील लोकांना प्रस्थापितांना कडवट लागली, असे म्हणत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर “सैतान” हा शब्द प्रयोगावर खुलासा केला आहे. साताऱ्यात सदाभाऊ खोत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनीदेखील समृद्धी महामार्गाच्या अपघात झाला त्यावेळेस काही लोक “देवेंद्रवासी” झाले असा शब्दप्रयोग केला होता. पण त्यांना हा शब्दप्रयोग करायचा नसावा, परंतु शरद पवार यांनी तो अनावधानाने केला होता. म्हणून तुम्ही आता गोळ्या घालणार का? कारण गुण्यागोविंदाने शिवसेना-भाजप सरकार नांदत असताना यामध्ये थोडाफोडी कोणी केली? याचा इतिहास तपासावा लागेल, असा खुलासा सदाभाऊ खोत यांनी केला.
शरद पवारांचा उदय अन् राजकाराणाचा ऱ्हासला सुरूवात
सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याविरोधात पातळी सोडून टीका केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ झाला होता. सदाभाऊ खोत यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रातील राजकारण प्रस्थापितांकडून विस्थापितांकडे चालल्याचं बघायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार साहेबांचा उदय झाला आणि तिथून पुढे राजकारणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. इतका ऱ्हास झाला की वाडे विरुद्ध गावगाडे आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा नवा संघर्ष उभा राहिला. सरंजामशाहीचा कालखंड पवारांमुळे उभा राहिलेला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि हा अंमल जवळजवळ ५० वर्ष महाराष्ट्रात राहिला, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटल होते.
सदाभाऊ म्हणाले होते, गावगाड्यामध्ये हा सैतान पुन्हा येता कामा नये
देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाला याचं मोठं श्रेय द्यावं लागेल. शरद पवार यांनी सरदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रावर राज्य केलं, त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली, गावगाडा उध्वस्त केला. ते सरदार आज सैरभैर पळायला लागले आणि पवार साहेबांवर काळानं मोठा सुड उगवला आहे. त्यामुळे शरद पवार यांना गावगाड्याकडे धावतं यावं लागत आहेत. ‘जैसी करणी वैसी भरणी’ कलयुगामध्ये ज्याचं पाप त्यालाचं फेडाव लागते. शरद पवारांना त्यांचं पाप खऱ्या अर्थांन फेडावे लागत आहे. हे आम्हा कार्यकर्त्यांचं काम आहे की गावगाड्यामध्ये हा सैतान पुन्हा येता कामा नये, अशी जळजळीत टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती.