सातारा लोकसभा 2024 भाजपाकडून लढवणार : माजी आ. नरेंद्र पाटील

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा लोकसभेसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी ही जागा भाजपचीच असून भाजपने उमेदवारी दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार आहे, असे सांगून एकप्रकारे बॉम्बच टाकला आहे. त्यामुळे आता भाजपाकडून जाहीरपणे उमेदवारीवर दावा केल्याने छ. उदयनराजे भोसले यांच्यासह अन्य इच्छुक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहणार आहे.
माजी आ. नरेंद्र पाटील म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले हे भाजपमधून निवडणूक लढणार होते. पण त्यांचे मनपरिवर्तन झाल्याने त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली. त्यानंतर मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा लोकसभेची निवडणूक लढणे महत्वाचे होते, त्यामुळे भाजपमध्ये काम करत असताना सातारा लोकसभेसाठी मला संधी दिली गेली. त्या निवडणुकीत मी उदयनराजे भोसले यांचे आव्हान स्वीकारून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत मला साडेतीन ते चार लाख मते मिळाली. याचबरोबर, जर संधी मिळाली तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही मला साथ मिळेल.अशी अपेक्षा नरेंद्र पाटील व्यक्त केली.
महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून सातारा लोकसभा मतदार संघावर दावा केला जावू लागल्याने तिढा वाढताना पहायला मिळत आहे. शिवसेनेकडून (शिंदे गट) जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी स्वतः उमेदवार असल्याचे म्हटले आहे. तर भाजपाकडून माजी आ. नरेंद्र पाटील यांनी पहिल्यांदाच आपण निवडणूक लढवू असे म्हटले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) इच्छुक असून जाहीरपणे सांगणार याकडे लक्ष असणार आहे. तसेच महायुतीतील सातारा लोकसभा मतदार संघामुळे युतीवर परिणाम होवू शकतो, असेही आता बोलले जावू लागले आहे.