अवैध गुटखा विक्री : पाटण, खटावला कारवाई, कराडातील एकाला पोलिस कोठडी
सातारा। जिल्ह्यात दोन ठिकाणी गुटखा पकडण्यात आला असून १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील कारवाईत कराड तालुक्यातील एकाला अटक केली असून त्याला दोन दिवस पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. तर खटाव तालुक्यात सापळा रचून ११ पोती गुटखा पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्याच्यात चांगलीच खळबळ उडाली असून जिल्ह्यात गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, विखळे (ता. खटाव) येथून पिकअप मोटारीतून (एमएच- 13- डीक्यू- 0550) बेकायदा, बिगरपरवाना गुटख्याची चोरटी वाहतूक होणार आहे, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज पोलिसांनी सापळा रचला. कलेढोण बाजूकडून पिकअप मोटार थांबवून त्याच्याकडे विचारपूस केली असता पानमसाल्याची 8 पोती, पान मसाल्याची 3 पोती मिळून आली व एक पिकअप मोटार असा 12 लाख 72 हजार 240 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
तर, मोरणा विभागात गुटखा विक्रीसाठी जात असताना कराड येथील गुटखा विक्रेत्याला मुद्देमालासह मल्हारपेठ पोलिसांनी पकडले. भरत मोहनलाल जैन (वय- 35, रा. शुक्रवार पेठ, कराड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. नवारस्ता, गव्हाणवाडी मार्गे पांढऱ्या रंगाच्या मोटारीने (एमएच- 11 वीके- 375) मोरगिरीकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गव्हाणवाडी फाट्यावर सापळा लावला. मोटार नवारस्ता बाजूने गव्हाणवाडी येथे आल्यावर त्याला थांबवून पोलिसांनी झडती घेतली असता मोटारीच्या डिकीमध्ये गुटखा मिळून आला. भरत जैन याच्याकडे चौकशी केली असता गुटखा विक्री करण्यासाठी मोरगिरी भागात निघाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एकूण तीन लाख 25 हजारांचा मद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संशयितास पाटण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.