कराड शहरात तिघांवर कोयत्याने हल्ला, पोलिसांकडून धरपकड

कराड | शहरातील विजय दिवस चौकातील दुकानाच्या पार्टीशनवरून एकाने तिघांवर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. हल्ल्यात तिघे जखमी झाले असून याप्रकरणी इमरान नजीर मुल्ला (वय- 42, रा. गुरुवार पेठ कराड ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून रियाज दिलावर मुल्ला, अर्शद रियाज मुल्ला (रा. रुक्मिणी प्लाझा, बुधवार पेठ कराड) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराडच्या विजय दिवस चौकातील साईबाबा मंदिरा शेजारी इमरान यांचे मुल्ला गॅस वेल्डिंग शॉप आहे. शुक्रवारी दुकानाचे पार्टीशनच्या पलीकडील दुकानदार रियाज दिलावर मुल्ला व त्याचा मुलगा अर्षद रियाज मुल्ला यांनी अचानक दुकानाच्या मध्ये असलेले लाकडी पार्टीशन काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी व संशयितांच्यात शाब्दिक चकमक झाली. रियाज मुल्ला याने फिर्यादीचा भाऊ असिफ सत्तार मुल्ला यास तुला जिवंत ठेवत नाही ठार मारतो, अशी धमकी दिली. त्यानंतर संशयिताने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले.
सदरचा प्रकार सुरू असताना फिर्यादी भांडणे सोडवण्यासाठी गेल्यावर रियाज मुल्ला याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने इमरान यांच्या डाव्या डोळ्याचे खाली वार करून जखमी केले. भांडणे सोडवण्यासाठी आलेला फिर्यादीचा भाऊ सैफ वजीर मुल्ला याच्या उजव्या हातावर अर्षद मुल्ला याने कोयत्याने वार केला. भांडणाचा प्रकार समजताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन संशयितांची धरपकड केली.