हलगर्जीपणा : उंब्रजजवळ महामार्गावर रूंदीकरणासाठी काढलेल्या खड्ड्यात कार पलटी
कराड | पुणे- बेंगलोर आशियाई महामार्गावर शिवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल सरोवर ढाब्यासमोर रस्ता रुंदीकरण कामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात कार पलटी होऊन अपघात झाला. मंगळवारी रात्री अकरा वाजण्याची सुमारास ही घटना घडली. दरम्यान हॉटेलचे मालक व कर्मचाऱ्यांनी कार मध्ये अडकलेल्या चौघांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर ते पुणे दिशेने निघालेली कार शिवडे गावच्या हद्दीत आल्यानंतर महामार्ग लगत रुंदीकरण करण्यासाठी काढलेल्या खोल खड्ड्यात ही कार पडली पलटी झाली. येथे गेल्या काही महिन्यांपासून रस्ता रुंदीकरणासाठी खुदाई करून ठेवण्यात आली आहे. मात्र, कोणतेही सुरक्षा फलक लावण्यात आले नसल्याने हा अपघात झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
अपघातग्रस्त कारमध्ये दोन दाम्पत्य प्रवास करत होते. सुदैववाने त्यांना दुखापत झाली नाही. त्यांना हॉटेल वरील कर्मचारी व मालक यांनी कारमधून त्यांना सुखरुप बाहेर काढले. घटनास्थळी उंब्रज पोलिसांनी भेट दिली. तसेच खोल खड्ड्यातून ही कार बाहेर काढण्यात आली आहे. दरम्यान महामार्ग रुंदीकरणाच्या कामात होत असलेल्या हलगर्जीपणामुळे उंब्रज परिसरात अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढलेले चित्र आहे.