Satara News : महाबळेश्वरला दुचाकी झाडावर आदळल्याने युवकाचा मृत्यू

सातारा | महाबळेश्वर शहरापासून चार किमी अंतरावर दुचाकी झाडावर धडकून झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. युवकाच्या दुचाकीची धडक एवढी भीषण होती की युवक जंगलात फेकला गेला. रस्त्याकडेला अपघातग्रस्त दुचाकी पाहून ये- जा करणाऱ्या लोकांनी अपघाताची माहिती दिली. या अपघातात ऋषिकेश विलास शिंदे (वय- 20, रा. महाबळेश्वर) असे जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाबळेश्वर शहरापासून अंदाजे चार किमी अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर कॅनॉट पीक पॉईंट परिसरात दुचाकी झाडावर धडकून आदळून अपघात झाला. महाबळेश्वर येथील रे गार्डन वाहनतळामध्ये ऋषिकेश शिंदे हा युवक कामाला होता. रात्री अकरा वाजता कामावरून तो क्षेत्र महाबळेश्वर येथे घरी जेवण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा रात्री नाईट ड्युटीवर क्षेत्र महाबळेश्वरहून महाबळेश्वरच्या दिशेने येत असताना अपघात झाला.
महाबळेश्वरमधील कॅनॉट पीक पॉईंट पासून काही अंतरावर मुख्य रस्त्यावर विरुद्ध दिशेला जाऊन त्याची यामाहा आर वन फाईव्ह (एमएच- 11 डीजी- 6011) ही दुचाकी थेट झाडावर जाऊन आदळली. अपघातानंतर ऋषिकेशला ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र, त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.