
कराड :- सहकारी बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या दि कराड अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड (शेड्युल्ड बँक) यांना ‘दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड’ यांच्या वतीने दिला जाणारा सन 2025-26 चा ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. बँकेला सलग दुसऱ्या वर्षी हा बहुमान मिळत असल्याने बँकेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कराड अर्बन बँकेने सहकार क्षेत्रात सातत्यपूर्ण प्रगती करत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. सुमारे 2501 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 5000 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसायाचा टप्पा गाठलेल्या या बँकेला राज्य पातळीवर ‘तृतीय’ क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे. सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, बँकेची प्रगती, सभासद व ग्राहकांचा दृढ विश्वास या बाबींची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. ‘दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड’ यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’ हा सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. त्यामुळे कराड अर्बन बँकेला मिळालेल्या या पुरस्कारामुळे बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कुशल नेतृत्व आणि सांघिक प्रयत्नांचे यश
बँकेचे अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लोहोटी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सीए धनंजय शिंगटे यांच्या नियोजनबद्ध वाटचालीमुळे बँकेने प्रगतीचा आलेख कायम राखला आहे. तसेच कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या मार्गदर्शनामुळे बँकेने नवनवीन क्षेत्रात आपला विस्तार केला आहे.
बँकेने शेवटच्या सात महिन्यात 750 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. बँकेचे सभासद, ग्राहक, हितचिंतक, संचालक मंडळ आणि सेवक वर्ग यांच्या एकत्रित योगदानामुळे हा पुरस्कार प्राप्त झाल्याची भावना बँकेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
संभाजीनगरला 12 सप्टेंबरला सन्मान
कराड अर्बन बॅंकेचा दि. 12 सप्टेंबरला पुरस्काराने सन्मान होणार आहे. दुपारी 2 वाजता वाजता ‘एक्सप्रेस इन हेरिटेज’, जालना रोड, केंब्रिज स्कूलच्या समोर, सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर येथे होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सीए धनंजय शिंगटे यांनी दिली.



