Satara News : कराडला नदीपात्रात मुलीचा तर कोरेगाव तालुक्यात महिलेचा विहीरीत बुडून मृत्यू
नदीत बुडालेली मुलगी सांगली जिल्ह्यातील

कराड- सातारा। कराड येथील कृष्णा कोयना नदीचा संगम झालेल्या प्रीतीसंगम घाटावर एका मुलीचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. रेठरे धरण (ता. शिराळा, जि. सांगली) येथील सेजल बनसोडे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तर दुसरीकडे कोरेगाव तालुक्यातील आर्वी (ता. कोरेगांव) येथे बुजलेली गाय आणि गाईचा कासरा धरलेली महिला विहिरीत पडल्याने पाण्यात बुडुन 45 वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील कराड व कोरेगाव तालुक्यातील घटनेमुळे खळबळ उडाली.
याबाबत कराड येथील घटनास्थळावरून मिळालेली माहिती, कराड येथील कृष्णा कोयना नदीचा संगम झालेल्या प्रीतीसंगम घाटावर सेजल बनसोडे आपल्या नातेवाईकासोबत सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या गेलेली होती. सेजल ही कराडमधील आपल्या नातेवाईकांकडे आलेली होती. कराडमधील नातेवाईक आणि ती आणि तीचे कुटुंबीय कराडमधील प्रीतीसंगम घाटावरती फिरण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान चार मुली या नदीपात्रात उतरल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही होते. मात्र, थोडे अंतर नदीमध्ये गेल्यानंतर चार पैकी एका मुलीचा हात सुटला आणि ती मुलगी नदीपात्रामध्ये बुडाली. नदीपात्रामध्ये बुडाल्यानंतर तिच्या नाका तोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला. साधारण दोन तास शोध घेतल्यानंतर या मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आले. त्यानंतर या मुलीचा मृतदेह कराडमधील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन नेण्यात आला.
तर रहिमतपूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास संगिता पोपट राऊत (वय- 45) ह्या गाई घेवून आर्वी येथील राऊतमळा शिवारात गेल्या होत्या. काही वेळाने पोपट वसंत राऊत हे मोठ मोठ्याने ओरडत गाय विहीरीत पडल्याचे चुलत भाऊ संजय राऊत यांना सांगितले. त्यानंतर पोपट, संजय आणि अन्य एकजण अश्या तिघांनी गाईला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर पोपट हे घरी आल्यानंतर संगिता ह्या घरी न दिसल्याने विहीरीत जावून पाहिले असता पाण्यावर चपला तरंगाना दिसल्या. विहिरीत पाणी जास्त असल्याने पाणी उपसले असता संगिता यांचा मृतदेह विहिरीतून अथक प्रयत्नाने काढल्याचे समजते. याबाबतची फिर्याद संजय रामचंद्र राऊत यांनी रहिमतपुर पोलिस ठाण्यात दिली आहे.