कराड बाजार समिती : सभापती विजयकुमार कदम तर उपसभापती संभाजी चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विजयकुमार कदम (बाबरमाची) यांची तर उपसभापती पदी संभाजी चव्हाण (वारूंजी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काँग्रेसच्या कै. स्वर्गीय विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या रयत पॅनलने 12- 6 अशी सत्ता मिळवल्यानंतर सभापती, उपसभापतीपदी निर्विवाद वर्चस्व राखले.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली रयत पॅनेलने विजय मिळवत सत्ता राखली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे प्रदेश सदस्य अतुल भोसले यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलने चुरशीची झुंज दिली. आज झालेल्या निवडीत सत्ताधारी गटाने बिनविरोध विजयकुमार कदम व उपसभापतीपदी संभाजी चव्हाण यांना संधी दिली आहे. निबंधक संदीप जाधव यांच्या उपस्थितीत निवडी पार पडल्या.
निवडीवेळी रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, वसंतराव जगदाळे, माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, संचालक प्रकाश पाटील, नितीन ढापरे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.