साताऱ्यासह कराड, पाटणला पावसाने झोडपले : नागरिकांची तारांबळ उडाली
महिनाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस अखेर बरसला
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडत आहे. साताऱ्यासह जिल्ह्यातील कराड, पाटण भागाला आज दुपारच्या सुमारास आलेल्या पावसाने जोरदार झोडपले. यामुळे रस्ते जलमय झाले असून नदी, नाले ओसंडून वाहू लागलेत. यावर्षी गतवर्षीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दुष्काळाचे सावट जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणवत आहे. मात्र, गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात काहीशा प्रमाणात वाढ होत असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कराड व पाटण तालुक्यात गेल्या दुपारी आलेल्या अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यासह लोकांची चांगलीच तारांबळ उडवली. जवळपास 2 ते 3 तास पावसाची रिपरिप सुरू होती. काहीकाळ रस्त्यावरील वाहनांना गाडीच्या लाईट लावूनच प्रवास करावा लागत होता. गेल्या महिन्याभरापासून गायब झालेला पाऊस, आज अचानक आल्याने वातावरणात गारवा दिसून आला.
कराड शहरातील कोल्हापूर नाका परिसरात तसेच अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालक व नागरिकांची मोठी गैरसोय झाली. सध्या कराड पालिकेचा कारभार हा अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर सुरू असून त्याकडे त्याचे लक्ष नसल्याचे पावसाने उघड केले. शहरातील चाैका- चाैकात नाले अोसडून वाहू लागले होते. तर ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित नसल्याने पावसाचे पाणी अनेक दुकानात शिरल्याचे पहायला मिळाले.