रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : रोख रक्कम व कागदपत्रे असलेली वकील महिलेची पर्स केली परत
कराड। कराड शहरात प्रवास करताना रोख रक्कम व महत्वपूर्ण कागदपत्रे असलेली पर्स एका वकील महिलेची गहाळ झाली होती. सदरची पर्स कोठेतरी गहाळ झाल्याने संबधितांनी कराड शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. या दरम्यान काही वेळातच एका रिक्षा चालकाने सदरील पर्स कराड शहर पोलिस ठाण्याला आणून देत प्रामाणिकपणा जपला. या रिक्षा चालकांचा सत्कारही करण्यात आला.
याबाबतची अधिक माहिती अशी, विद्यानगर येथील ॲड. उषा भास्कर मिसाळ या कोर्ट कामाकरीता कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे निघाल्या होत्या. विद्यानगर येथून रिक्षातुन प्रवास करुन बसस्टॅन्डवर उतरल्या नंतर त्यांचे जवळील पर्स कोठेतरी गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तात्काळ त्यांनी शहर पोलीस स्टेशनशी संपर्क केला. त्यांच्या पर्समध्ये त्यांचे बँक एटीएम कार्डस, डेबिट कार्डस, रुपये 5000/- रोख रक्कम, वाहनांच्या चाव्या तसेच मोबाईल हॅन्डसेट असे साहीत्य होते. तोपर्यंत काही वेळातच आश्पाक दस्तगीर मुलाणी (रा. चौंडेश्वरी नगर, गोवारे ता. कराड) या रिक्षा चालकाने ती पर्स पोलिसांकडे आणून दिली.
कराड शहरातील ऑटोरिक्षा क्रमांक (एम. एच. 50/ एम. 0178) याचे चालक आश्पाक मुलाणी यांच्या समक्ष ॲड. उषा मिसाळ यांना पोलीसांच्या समक्ष पर्स परत करण्यात आली. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणा बददल कराड शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजु डांगे यांनी अभिनंदन केले. तसेच रिक्षाचालक आश्पाक मुलाणी यांचा सत्कार पोलिस व वकील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रिक्षाचालकाचे प्रामाणिकपणाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.