कराड तालुका ग्रामपंचायत निकाल ”जैसे थे” : राष्ट्रवादी 8, काॅंग्रेस 3 तर भाजपाने रेठरे राखले…संपूर्ण निकाल पहा
कराड – विशाल वामनराव पाटील
कराड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीचा निकाल आज जाहीर झाल्याने गावचे नवे कारभारी मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आले. कराड तालुक्यात स्थानिक विकास आघाडीत झालेल्या निवडणुकात ”जैसे थे” परिस्थिती दिसून आली. केवळ एकमेव टेंभू ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविण्यात विरोधकांना यश आले असले तरी गड आला पण सिंह गेला असा निकाल पहायला मिळाला. रेठरे ग्रामपंचायतीत अपेक्षेप्रमाणे भाजपाने एकहाती सत्ता राखण्यात यश मिळवले तर कराड उत्तरेत आ. बाळासाहेब पाटील यांचा करिष्मा दिसून आला. कराड दक्षिणेत काका- बाबा गटाला 3 ग्रामपंचायतीत तर भाजपाला एका ठिकाणी विजय मिळवता आला.
1) शेळकेवाडी ग्रामपंचायतीच्या आठही जागा काॅंग्रेसच्या अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर आणि आ.पृथ्वीराज चव्हाण गटाने राखली. सरपंचपदी प्रकाश तुकाराम शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 2) येवतीत अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर आणि आ.पृथ्वीराज चव्हाण गटाच्या भैरवनाथ रयत पॅनेलने ग्रामपंचायतीच्या 10 पैकी 9 जागा जिंकल्या. विरोधातील डाॅ. अतुल भोसले गटाच्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. सरपंचपदी दादा- बाबा गटाच्या हिराबाई भगवान गुरव यांनी विजय मिळवला. 3) येणपे ग्रामपंचायतीच्या सर्वच्या सर्व 12 जागांवर अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर आणि आ.पृथ्वीराज चव्हाण गटाने विजयी मिळवल्या. येथे सरपंचपदी मनीषा प्रताप शेटे यांची वर्णी लागली.
4) रेठरे बु. ग्रामपंचायतीत डॉ. अतुल भोसले गटाच्या कृष्णा विकास आघाडीने 18 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळवला. रेठरे बुद्रुकच्या ग्रामपंंचायतीत भाजपाने 7 बिनविरोध निवड झाली. तर विरोधी आ. पृथ्वीराज चव्हाण गटाच्या मारुती कापुरकर ग्रामविकास पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. सरपंचपदी हणमंत बाबूराव सूर्यवंशी यांची निवड जवळपास 2200 मतांनी निवड करण्यात आली.
5) टेंभु ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाला धक्का बसला असून विरोधातील गटाला 8 जागांवर विजय मिळाला. तर माजी सरपंच युवराज भोईटे यांच्या पॅनेलला सरपंच पदासह एक जागेवर समाधान मानावे लागले. सरपंचपदी रुपाली युवराज भोईटे यांची अवघ्या 10 मतांनी विजय झाला. 6) गोसावेवाडी ग्रामपंचायतीत सह्याद्रि ग्रामविकास पॅनेलला 10 पैकी 2 बिनविरोधसह 8 जागा मिळाल्या. तर विरोधी गटाला केवळ 2 जागा मिळाल्या. सरपंचपदी अस्मिता आनंदा गोसावी यांची निवड झाली. 7) सयापुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत माधुरी संदीप वाघमारे विजयी. याठिकाणी सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. 8) पिंपरी ग्रामपंचायतीच्या धवलक्रांति पॅनेलने सरपंच पदासह 4 जागा जिंकल्या. यातील 3 बिनविरोध तर जननी देवी पॅनेलने 3 ठिकाणी विजय मिळवला. याठिकाणी एक जागा रिक्त राहिली आहे. सरपंचपदी विनोद वांगडे यांची निवड झाली.
9) भोसलेवाडी ग्रामपंचायतीच्या गोपालनाथ महाराज पॅनेलने आठ पैकी आठ जागांवर विजयी तर विरोधी परब्रम्ह गोपालनाथ पॅनलला एकही जागा मिळाली नाही. भोसलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मारुती विजय ढेबे विजयी झाले. 10) बानुगडेवाडी ग्रामपंचायतीच्या जय हनुमान पॅनेलला 3 जागा मिळाल्या असून त्यातील 2 बिनविरोध झाल्या होत्या. तर सह्याद्रि पॅनेलला 5 जागांसह सरपंचपदही मिळाले. सरपंचपदी सह्याद्रि पॅनेलच्या अबिदा शब्बीर मुजावर यांची निवड झाली. 11) कांबिरवाडी ग्रामपंचायतीच्या 7 जागांपैकी जनशक्ति पॅनेलला सरपंच पदासह 4 जागावर यश तर विरोधी जय हनुमान ग्रामविकास पॅनेलला 3 जागा मिळाल्या. सरपंचपदी जनशक्ति पॅनेलच्या रुपाली अनिल कांबिरे यांची निवड झाली. 12) हेळगाव ग्रामपंचायतीच्या 10 पैकी 9 जागा आ. बाळासाहेब पाटील गटाच्या सह्याद्रि ग्रामविकास पॅनेलने जिंकल्या तर विरोधी हेळगाव विकास आघाडिला फक्त 1 जागा जिंकता आली. सरपंचपदी मिलिंद कृष्णा पाटील यांची निवड झाली.