मरळीला उद्या भाजप- शिवसेना महायुतीचे शक्तिप्रदर्शन : मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री येणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मरळी- दाैलतनगर (ता. पाटण) येथे उद्या भाजप- शिवसेना महायुतीकडून शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. कारखाना स्थळावर जाणाऱ्या मार्गावर भाजप व शिवसेना चिन्हाचे झेंडे लावण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे बॅंनरही मोठ्या प्रमाणावर उभारले असून जवळपास 20 ते 25 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सातारा जिल्हा दाैऱ्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याच्यासह मंत्रीमंडळातील अनेक दिग्गज नेते येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणावर राबत आहे. जिल्ह्यातील सर्व मोठ- मोठे अधिकारी सध्या दाैलतनगर येथे ठाण मांडून आहेत. तसेच या सर्व तयारीची पाहणी स्वतः उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई करत आहेत. आज अधिकाऱ्यांची बैठकही संपन्न झाली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण, अप्पर पोलिस अधीक्षक बापू नांगर, कराडचे डीवायएसपी डाॅ. रणजित पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला 25 हजार लोकांची उपस्थिती
राज्यातील शासन आपल्या दारी या शासकीय योजनेचा शुभारंभ उद्या सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित केला जाणार आहे. या मेळाव्यासाठी दोन हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी 20 ते 25 हजार लोक उपस्थित राहतील असा दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. त्याकरिता येणाऱ्या लोकांच्या गाडी पार्किंगची सोयही करण्यात आली आहे.