Accident News मद्यधुंद चालकाने 9 जणांना उडवले : एकाचा कवठी फुटून जागीच मृत्यू
कोल्हापूर | काल रात्री उशिरा मद्यधुंद चालकाने अंदाधुंद कार चालवीत गजबजलेल्या महावीर कॉलेज चौकात दोन मोटारींसह पाच दुचाकी, अशा सात वाहनांना ठोकरले. या कारचालकाने 9 जणांना उडवले असून यामध्ये दोघे गंभीर जखमी आहेत तर एकाचा जागीच मृत्यू झाला. कारची दुचाकीला एवढी जोरात धडक बसली होती की, मोपेड गाडी सुमारे पंधरा ते वीस फुट उंच हवेत उडाली. चालक रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी त्याच्या डोक्यावर चारचाकीचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. कवटी फुटल्याने रस्त्यावर मेंदू विखुरला होता. अशा भयानक अपघाताने कोल्हापूर शहर चांगलेच हादरले.
एसयूव्ही कार चालविणार्या मद्यपी चालकाचे नाव ऋषिकेश बाबुराव कोतेकर (वय 29, रा. बुवा चौक, शिवाजी पेठ) असे आहे. या भीषण अपघातात वरुण रवी कोरडे (वय 22, रा. उदयसिंगनगर, महावीर महाविद्यालयाजवळ, कोल्हापूर) या तरुण बॅडमिंटनपटूचा जागीच करुण अंत झाला. रात्री साडेदहाच्या सुमारास मद्यपी चालकाने भरधाव वाहनाने चिरडल्याने महावीर कॉलेजच्या प्रवेशद्वारात सात वाहनांना धडक दिल्याने रस्त्यावर रक्त आणि काचांचा सडा पडला होता. या अपघातप्रकरणी मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत असलेला चालक ऋषिकेश कोतेकर याला जमावाने बेदम चोप देऊन पोलिसांनी ताब्यात दिले.
मद्यधुंद चालकला जमावाने चोपले, गर्दी हटविण्यासाठी लाठीमार
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ऋषिकेश कोतेकर याला जमावाने चांगलेच चोपले. क्षणभर काय घडले हेच कुणाला कळेनासे झाले. रस्त्यावर वरूण निपचित पडला होता. घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. जमावाने कोतेकरला गाडीतून बाहेर काढून बेदम चोप दिला. दुर्घटनेची माहिती मिळताच शाहुपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अपघातग्रस्त वाहने, जखमी आणि नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याने पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली.बघ्याची गर्दी हटवण्यासाठी पोलिसांनी किरकोळ लाठीमारही करावा लागला. दरम्यान वरूणचा मृतदेह पोलिसांनी सीपीआर रुग्णालयात आणला. वरूणची मोपेड पाहून त्याचे मित्र सीपीआरमध्ये आले, यानंतर त्याचे आई-वडील आणि मामा, काका असे नातेवाईक आले. मामांनी मृतदेह ओळखला. यानंतर नातेवाईकांनी केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता.