चक्रीवादळाने 27 पोल पडले : मसूर भागातील ‘या’ 5 गावात महावितरण अलर्ट
कराड | महावितरणच्या शिरवडे शाखा अंतर्गत चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले होते. या वादळामुळे मसूर भागातील 5 गावातील तब्बल 27 पोलवरील तारा तुटून विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या नुकसानाची दखल तातडीने घेत शिरवडे शाखेचे कनिष्ठ अभियंता पी.डी. गजरे यांनी महावितरणचे अभियंता आर. एस. बुंदेले व उपकार्यकारी अभियंता सी. एस. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने दुरुस्ती केल्याने या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली.
याबाबत अधिक माहिती अशी मंगळवारी झालेल्या चक्रीवादळाने महावितरणचे शिरवडे शाखा अंतर्गत शहापूर, नडशी, पिंपरी, शिरवडे, कोणेगाव इत्यादी ठिकाणी अकरा केव्हीचे 12 पोल व एलटी चे 15 पोल लाईनवर झाडे व झाडाच्या फांद्या मोडून पडल्याने काही ठिकाणी तारा तुटल्या तर काही ठिकाणी पोल मोडून पडले होते. त्यामुळे पाणी पुरवठ्यासह घरातील लाईट्स बंद असल्याने ग्रामस्थांना अनेक नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. तर शहापूर पाणीपुरवठा योजनेचे दोन पोल मोडून पडल्याने गांभीर्याने दखल घेत येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने दोन पोल बसवल्याने येथील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली.
या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी कनिष्ठ अभियंता पी. डी. गजरे यांनी लाईनमन के.डी. गायकवाड ,वायरमेन अभिजीत कुंभार, दीपक काशीद ,हरिबा सावंत ,दत्तात्रय कारंडे, ऋषिकेश भांगे आणि सर्व स्टाफ यांच्या मदतीने ठेकेदार मंगेश महापुरे ,अनिल बामणे यांच्या साह्याने शहापूर गावातील विद्युत पुरवठा सुरळीत केल्याने शहापूरचे सरपंच ताजुद्दीन मुल्ला, उपसरपंच पल्लवी गणेश शिंदे, माजी चेअरमन दत्तात्रय शेलार, भास्कर पाटील तसेच गावातील ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आभार मानले.