मराठा आरक्षण : चाफळ, शेणोली उंडाळेत साखळी उपोषण तर बनवडीत मुस्लिम समाजाचा अन्नत्याग
उंब्रज प्रतिनिधी | श्रीकांत जाधव
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला चाफळ विभागाच्या वतीने पाठिंबा देत चाफळ विभागात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करीत गुरुवारी चाफळसह, पाटण आणि ढेबेवाडी येथे सकल मराठा बांधवांनी साखळी उपोषणास सुरुवात केली. तसेच कराड तालुक्यातील उंडाळे, शेणोली, उंब्रज, बनवडी येथेही साखळी उपोषण सुरू आहे.
कराड आणि पाटण तालुक्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी केली असून ‘चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष.’आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाच या घोषणांनी परिसर दणाणून सोडला जात आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण मराठा समाज पेटून उठला असून या आरक्षण मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चाफळ येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणास विविध गावातून आलेल्या मराठा बांधवांनी हजेरी लावत पाठिंबा दिला. विभागातील विविध गावांत राजकीय नेत्यांना गाव बंदीचे फलक लावण्यात आले आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत राजकीय नेत्यांनी गावात येऊ नये असे स्पष्टपणे मराठा समाज बांधवांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विभागात राजकीय नेत्यांचे दौरे बंद झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक तीव्रतेने सुठावा यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ग्रामीण भागात साखळी उपोषणाचा मार्ग निवडला जात आहे. चाफळ विभागात मराठा समाज बांधवांकडून माजगाव, शिंगणवाडी, डेरवण, खोनोली, दाढोली, नानेगाव, धायटी, पाडोळशी, केळोलीसह विभागातील गावागावात नेत्यांना गावबंदी केली आहे. त्याबाबतचे फलक ही गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत.
बनवडी येथे मुस्लिम समाजाचे अन्नत्याग उपोषण
कराड तालुक्यातील बनवडी येथे आज दिवसभर अन्नत्याग करून मुस्लिम समाज बांधवांनी मराठा समाज आरक्षणासाठी पाठिंबा दिला. सकाळी दहा वाजता चालू केलेले उपोषण आज सायंकाळी पाच वाजता स्थगित केले. मराठा समाजास लवकरात लवकर आरक्षण मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
मराठा आरक्षणासाठी विजयनगरमध्ये निघाला कॅण्डल मार्च
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळावेत आणि 50 टक्केच्या आतील टिकणारं आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आज (बुधवारी रात्री) कराडनजीकच्या विजयनगर गावात सकल मराठा समाजाच्यावतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये प्रज्वलित केलेल्या मेणबत्त्या हातात घेऊन लहान मुले आणि युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.