मराठा आरक्षण : फलटण- माणला विद्यार्थी आक्रमक, एसटीवर दगडफेक- मुंडन, कराड ग्रामीण भागात बाजारपेठ बंद

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
साता-यातुन मराठा आरक्षण मागणीला आता चांगलाच प्रतिसाद मिळत असुन माण तालुक्यातील मार्डी येथे मुंडन आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. फलटण आणि दहिवडी येथे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शाळेत न जाण्याचा विद्यार्थ्यांनी निर्णय घेत घोषणाबाजी केली. गोंदवले येथे नाशिक- गोंदवले एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वयंपूर्तीने बंदही पाळण्यात येत आहे. कराड तालुक्यातील उंब्रज आणि तांबवे फाटा येथे पूर्ण बाजारपेठ बंद ठेवत जिल्हा बंदीत व्यापारी, नागरिकांनी सहभाग नोंदवला.
फलटण आणि माण तालुक्यात विद्यार्थ्यांचा पाठिंबा
फलटण तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण अत्यंत शांततेत सुरू आहे. दरम्यान, आसू गावातील असंख्य विद्यार्थ्यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र तसेच ओबीसी प्रवर्गातून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत शाळेत जाणार नसल्याचा निर्धार केला आहे. गेल्या सहा दिवसापासून अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज सकाळी नऊ वाजता शाळेला न जाता आसू बसस्थानक येथे गावातील पहिली ते नववीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या विद्यार्थ्यांनी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्धार केला आहे.
मार्डीत मुंडन तर गोंदवलेत बसवर दगडफेक
माण तालुक्यातील मार्डीत आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंडन आंदोलन करण्यात आलं. माण तालुक्यात आरक्षण मागणीचे आंदोलन हिंसक वळणाकडं जाताना आज सकाळी पहायला मिळालं. गोंदवले येथे रात्री मुक्कामी असलेली नाशिक- गोंदवले ही बस अज्ञात व्यक्तींनी फोडली.
साताऱ्यात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिल्या घोषणा
साताऱ्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या साखळी उपोषणात आज भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले. दरम्यान, मराठा आरक्षणावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी घोषणा दिल्या. त्यावेळी आंदोलकांनी त्यांच्या व्यथा आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे व्यक्त केल्या. तसेच मनोज जरांगे पाटील यांना काय झालं तर याचा मोठा उद्रेक होईल. त्यामुळे आम्हाला त्रास देऊ नका आणि लवकरात लवकर आरक्षण द्या अशा भावना मराठा बांधवांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे व्यक्त केल्या.