उंब्रज येथे काल कडकडीत बंद तर आजपासून साखळी उपोषण

उंब्रज प्रतिनिधी | श्रीकांत जाधव
मराठा सकल समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी काल उंब्रज येथे कडकडीत बंद पाळण्यात आला होता. आता उंब्रज व परिसरातील मराठा बांधवांकडून साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या तसेच छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून उपोषणाला सुरूवात करण्यात आली.
मनोज जरांगे- पाटील यांच्या समर्थनार्थ कराड तालुक्यातील उंब्रज येथे आज आणि उद्या असे दोन दिवस साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणाला उंब्रज आणि परिसरातील मराठा बांधवासह इतर लोकांनीही पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा यशस्वी होत नाही, तोपर्यंत मराठा बांधव शांत राहणार नाही. तेव्हा शासनाने लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बाजारपेठ उंब्रज येथे साखळी उपोषणास सुरूवात झाली असून समाजाच्या मागण्या मान्य होण्यासाठी बहुसंख्य मराठा समाजाने एकत्रित यावे, असे आवाहन सकल मराठा समाज बांधवांनी केले आहे.