मसूर पोलीस इमारतीच्या कामाला वेग : लवकरच शुभारंभ

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
मसूर पोलीस ठाण्यासाठी निवडण्यात आलेल्या आरफळ वसाहतीतील इमारतींचे काम गतीने सुरू आहे. डागडूजीच्या कामासाठी डीपीडीसीतून जिल्हा पोलीस प्रमुखांच्या प्रयत्नाने 34 लाखांचा निधी मिळाला. कंत्राटदाराकडून एक महिन्यापासून डागडुजीचे काम सुरू आहे. येत्या 30 तारखेपर्यंत काम पूर्ण होईल, असा विश्वास देण्यात आला आहे. त्यामुळे मसूर पोलीस ठाण्याच्या शुभारंभाच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या व फक्त कागदोपत्रीच असलेल्या पोलीस ठाण्याचे घोंगडे भिजत पडले होते. तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मसूर पोलीस ठाण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पोलिस ठाणे मंजुरीसाठी गृहविभागाने 22 एप्रिल 2021 रोजी परिपत्रक काढले. पोलीस ठाण्याला जून 2022 मध्ये कर्मचारी देण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची शासनाने एक महिन्याची मुदतवाढ केल्याने व त्यानंतर महायुतीचे सरकार बरखास्त होऊन नवीन सरकार आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न भिजत पडला. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बंसल यांनी मसूर पोलीस ठाण्यासाठी अधिकारीही नियुक्त केला. परंतु अधिकाऱ्याने चार्ज घेण्याआधीच पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची बदली झाल्याने पोलीस ठाण्याच्या शुभारंभाचा प्रश्न भिजत पडला.
त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये जिल्ह्याचा पदभार स्विकारलेले जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी पोलीस ठाणे लवकरात लवकर सुरू करतो अशी ग्वाही दिली होती. जिल्हा पोलीस प्रमुखांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून मसूरच्या आरफळ वसाहतीतील स्वतंत्र सहा खोल्यांची इमारतीसह एका आरसीसी अशा दोन इमारतींची निवड केली. त्यानंतर पत्रव्यवहाराद्वारे इमारत पोलीस ठाण्यासाठी मंजूर करून घेतली. इमारतीच्या डागडुजीसाठी प्रशासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार 34 लाखांचा निधी मंजूर करून घेतला. जिल्हा पोलीस प्रमुखांनी पोलीस ठाण्यासाठी सपोनि विठ्ठल शेलार व पोलीस उपनिरीक्षक म्हणून महेश पाटील यांची नियुक्ती केली. मात्र, ठाणे सुरू न झाल्याने शेलार यांनी अद्याप चार्ज घेतला नाही. फेब्रुवारी महिन्यात इमारतीच्या डागडुजीसाठी टेंडर निघाले. एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात कामास सुरुवात झाली. खिडक्यांच्या काचा, दारे, फरशी, रंगरंगोटी, विद्युत फिटिंग व इतर किरकोळ कामांसाठी पंधरा ते वीस दिवस अपेक्षित होते. कंत्राटदाराकडून कामाच्या दिरंगाईबद्दल ग्रामस्थांमधून नाराजी उमटली होती. आता कामाने वेग घेतला आहे. त्यामुळे 30 तारखेपर्यंत काम पूर्ण होईल, असा ठाम विश्वास देण्यात आला आहे.