कडेगांवमधील स्वाभिमानीची बैठक निष्फळ : सातारा, सांगलीतील साखर कारखान्यांना अल्टिमेट
कडेगांव | सांगली जिल्ह्यातील ऊसदराची बैठक कडेगांव येथील सोनहिरा कारखान्यावर आयोजित करण्यात आली होती. आ. विश्वजित कदम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील बैठक निष्फळ झाल्याने आंदोलनाचा भडका कोणत्याही क्षणी उडणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत खा. राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्याचा ऊसदर ठरविण्यासाठी स्वाभिमानीकडून अल्टिमेट दिला आहे.
कडेगांव (जि. सांगली) येथे सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची ऊसदराबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पहिल्यांदा साखर कारखानदरांची बैठक झाली, त्या बैठकीला खा. संजय पाटील, आ. विश्वजित कदम, आ. अरूण लाड, आ. मानसिंगराव नाईक, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, विशाल पाटील, वैभव नायकवडी, विजय पाटील, जितेंद्र धारू, उत्तम पाटील आदी उपस्थित होते. तर त्यानंतर माजी मंत्री विश्वजित कदम यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक झाली.
सांगली जिल्ह्याच्या दराचा साताऱ्यात परिणाम
सांगली जिल्ह्यातील सोनहिरा, राजाराम बापू सहकारी साखर कारखाना, क्रांती साखर कारखाना सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर आहेत. तर सातारा जिल्ह्यातील कृष्णा साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र सातारा आणि सांगली जिल्ह्याचे आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊसदर जाहीर होताच, त्याचा परिणाम सातारा जिल्ह्यातील ऊसदरावर होणार आहे. त्यामुळे सांगली, सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उद्या सकाळपर्यंतचा अल्टिमेट स्वाभिमानीकडून देण्यात आला असून त्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल.