साताऱ्यात कमानी हौद परिसरात मध्यरात्री गोळीबार

सातारा प्रतिनिधी/ वैभव बोडके
सातारा शहरात मध्यरात्री खळबळजनक घटना घडली असून या घटनेमुळे शहर परिसर हा हादरला आहे. शहरातील कमानी हौद परिसरात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळीबार करणारा संशयित पोलिसांच्या हाती लागल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. या घटनेत सहा जणांच्या टोळीने एकाला मारहाण करत फायरिंग केले. सुदैवाने यात कोणी गंभीर जखमी झाले नसून परिसर मात्र भीतीने हादरून गेला आहे. दरम्यान, रस्त्यावर आडवी लावलेली दुचाकी बाजू घे म्हटल्याचे कारणातून मारहाण करत फायर केले असल्याचे कारण समोर येत आहे. धीरज ढाणे, हर्षद शेख (दोघे रा.मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, सातारा) व अनोळखी चौघे असे हल्लेखोर होते. या घटनेत विशाल अनिल वायदंडे (वय 27, रा. शनिवार पेठ, सातारा) व त्याचा मित्र जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील कमानी हौद परिसरात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. यामध्ये वायदंडे नावाच्या एका व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आला. संशयित आरोपीने चार राऊंड फायर केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात एकच बंदुकीची बुलेट घटनास्थळी आढळून आली आहे.
साताऱ्यात मध्यरात्री गोळीबार झाल्याची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला असून गोळीबार करणाऱ्या संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे कमानी हौद परिसरात तसेच सातारा शहरात खळबळ उडाली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून अधिक तपास सातारा पोलीस करत आहेत.