MSEB चा भोंगळ कारभार : मसूरच्या शेतकऱ्याच्या शेतीला वीज नाही, मात्र वीज बिलाचा शाॅक
मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
महावितरणच्या कामकाजाचे अनेक नमुने, किस्से, भोंगळ कारभार वीज ग्राहकांना अनुभवास येतो. आता तर एक एप्रिलपासून ग्राहकांच्या माथ्यावर वाढीव बिलांचा बोजाही दिला आहे. त्यातच मसूरच्या एका शेतकऱ्याला शेतीपंपाची वीज जोडणी दिली नसतानाही 2 हजार 60 रुपयाचा वीज बिलाचा शॉक दिला आहे. न्यायासाठी या शेतकऱ्याला मसूर व उंब्रज वीज वितरणच्या दोन्ही कार्यालयात वाऱ्या मात्र घडल्या. कार्यालयाच्या साहेबांशी संपर्क साधला, मात्र मसूरच साहेब म्हणतय उंब्रजला जावा… उंब्रजच साहेब म्हणतय मसूरला जावा. शेतीपंपाच्या जोडणीसाठी दोन वर्षापासून महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारतोय. वीज जोडणी नाहीच, वर महावितरणने बिलाचा शॉक मात्र दिलाय अशी प्रतिक्रिया शेतकरी बाळासाहेब कदम यांनी हॅलो न्यूजला दिली.
मसूरचे बाळासाहेब कदम या शेतकऱ्याला दोन वर्षापासून शेतीपंपासाठी वीज पोहोचली नाही. या शेतकऱ्याने 21 सप्टेंबर 2021 रोजी शेतीपंपासाठी रीतसर सर्व कागदपत्रांसह नियमानुसार वीज जोडणीची मागणी केली आहे. त्यांनी 12 हजार रुपयाचे कोटेशनही भरले आहे.
मात्र, वीज जोडणीसाठी हेलपाट्या शिवाय महावितरणने काहीच दिलं नाही. वीजजोडणी तर नाहीच वर 2 हजार 60 रुपयाचा वीज बिलाचा शॉक दिला आहे, असा हा महावितरणचा भोंगळ कारभार मात्र शेतकऱ्यांना, ग्राहकांना त्रासदायक ठरत आहे. महावितरण आता या शेतकऱ्याला त्वरित शेतीपंपाची जोडणी करणार का. पुढचा त्रास तरी वाचणार का. हा प्रश्न अनुत्तरीत आहे.