देशात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णपणे लागू करण्याचा नरेंद्र मोदींचा निर्धार : चंद्रकांत पाटील
कृष्णा विद्यापीठात ‘जैवतंत्रज्ञान विकास’ विषयावर राष्ट्रीय विद्यार्थी परिषद
कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सक्षमपणे घडविण्यासाठी आणि व्यक्तीच्या सृजनशीलतेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णपणे लागू करण्याचा निर्धार केला आहे. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे नवनिर्मितीला चालना देणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते.
कृष्णा विश्व विद्यापीठ संलग्न कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ अलाइड सायन्सेस आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा विद्यापीठात ‘जैवतंत्रज्ञान विकास’ या विषयावर आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचा आज समारोप झाला. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. तसेच कुलपतींचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख, अलाईड सायन्सचे विभागप्रमुख डॉ. गिरीश पठाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या दोनदिवसीय परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सादर केलेले संशोधन प्रकल्प थक्क करणारे आहेत, असे गौरवोद्गार काढून कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी भारतीय कृषी उद्योगाच्या विकासासाठी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवीन संशोधन होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी डाॅ. प्रवीण शिणगारे, डाॅ. अतुल भोसले, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. नीलम मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. गिरीश पठाडे यांनी प्रास्तविक केले. ज्योत्स्ना गांधी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. स्नेहल मसुरकर यांनी आभार मानले.
राष्ट्रीय बायोटेक युवा पुरस्कारांचे वितरण
या परिषदेत अखिलेशकुमार (बिहार), नंदकुमार कदम (शिराळा), धैर्यशील यादव (शिराळा), डॉ. आशिष पोलकडे (पुणे), डॉ. प्रशांत ठाकरे (अमरावती), डॉ. महेश चवदार (सांगली), डॉ. नीरज घनवटे (अमरावती) यांना राष्ट्रीय बायोटेक पुरस्कार, तर डॉ. शर्वरी रोकडे (कोल्हापूर) हिला राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रीतिमान कौर (पंजाब), कु. कुसूम (हिमाचल प्रदेश), उद्दिप्ता गुहा (मेघालय), कार्तिक चौहान (गुजरात), यशवंत पाटील (शिराळा), ऋषिकेश शिंदे (सातारा), डॉ. रविराज शिंदे (मुंबई), अमेय रांजेकर (पुणे), जय भट्ट (गुजरात), राहुल शेळके (बार्शी), निकुंज परमार (गुजरात) यांना राष्ट्रीय बायोटेक युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.