फलटणला अनैतिक संबधाच्या संशयावरून मारहाणीत महिलेचा खून

फलटण | मुंजवडी (ता. फलटण) येथील पवारवस्तीत घराशेजारील महिलेशी अनैतिक संबधाच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा खून झाला. सीताबाई किसन सस्ते (रा. पवारवस्ती, मुंजवडी, ता. फलटण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची तक्रार प्रमिला सोमनाथ सस्ते (रा. पवारवस्ती) यांनी फलटण पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, संशयितांपैकी तानाजी घुले यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंजवडीतील पवारवस्ती (ता. फलटण) येथे रविवारी रात्री दहाच्या सुमारास प्रमिला सोमनाथ सस्ते व त्यांचे पती सोमनाथ किसन सस्ते व सासू सीताबाई किसन सस्ते हे सर्व घरात होते. सोमनाथ किसन सस्ते यांचे घराशेजारील महिलेशी अनैतिक संबंधच्या संशयावरून चिडून जाऊन रमेश तानाजी घुले, तानाजी राजाराम घुले व स्वाती रमेश घुले यांनी घरात घुसून सोमनाथ सस्ते यांना जीवे मारण्यासाठी सुरुवात केली.
घटनेत मारहाण करतेवेळी झालेल्या झटापटीत फिर्यादीच्या सासू, सोमनाथ यांच्या आई सीताबाई किसन सस्ते यांच्या पोटात चाकू खुपसून खून करण्यात आला. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी भेट दिली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक गोडसे करत आहेत.