ग्रामसेवक मिळेना : मसूर ग्रामपंचायतीला महाराष्ट्र दिनी ठोकले टाळे, आज काढले
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळत नसल्याच्या निषेधार्थ सरपंच, उपसरपंच , सदस्य व पदाधिकाऱ्यांनी १ मे महाराष्ट्र दिनी मसूर ग्रामपंचायतीला बेमुदत टाळे ठोकले होते. स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी या मे महिन्यातच दिला जाणार आहे. या गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार ग्रामपंचायतीला ठोकलेले टाळे आज काढण्यात आले.
कराड उत्तर मतदारसंघातील निमशहरी, मध्यवर्ती व राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मसूर ग्रामपंचायतीला एक वर्षापासून प्रभारी ग्रामसेवक असल्याने सर्वसामान्य जनतेची अनेक कामे रखडली. वारंवार मागणी करूनही पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळेना. त्यामुळे अधिकारी द्या, अन्यथा महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायतला टाळे ठोकू असा इशारा सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी प्रशासनाला दिला होता. प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्यामुळे १ मे रोजी पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळत नसल्याच्या निषेधार्थ सरपंच, उपसरपंच , सदस्य व पदाधिकाऱ्यांनी मसूर ग्रामपंचायतीला टाळे ठोकले होते.
एक वर्षापूर्वी ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी यांची बढती झाल्याने बदली झाली. त्यांच्या जागी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळालेले नाहीत. सध्या टेंभूला कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी विकास पाटील यांच्याकडे मसूरच्या ग्रामपंचायतचा प्रभारी कारभार सोपवण्यात आला आहे. बहुतांश वेळा ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध होत नसल्याने ग्रामपंचायतचा कारभार ठप्प झाला. ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे दाखले, उतारे मिळत नसल्याच्या तक्रारी सुरू राहिल्या. महसुलात रिकवरी नाही, विविध कामे रखडली. पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळत नसल्याच्या निषेधार्थ सरपंच पंकज दीक्षित, सदस्य रमेश जाधव, माजी उपसरपंच संजय शिरतोडे, सदस्य कैलास कांबळे, विकास पाटोळे, श्याम पार्लेकर, सुनिता मसूरकर, पूजा साळुंखे, कौशल्या पाटोळे, वैशाली पाटोळे, रूपाली गरवारे, कांचन पारवे या पदाधिकाऱ्यांनी १ मे महाराष्ट्रदिनी मसूर ग्रामपंचायतीला बेमुदत टाळे ठोकले होते.
आज ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या समवेत गटविकास अधिकारी यांनी चर्चा केली. चालू मे महिन्यात होणाऱ्या पदोन्नती व बदली प्रक्रियानंतर मसूरला स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी देण्याबाबत निर्णय झाला. तोपर्यंत सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी पूर्ण वेळेत सकाळी नऊ ते पाच या वेळेत प्रभारी ग्रामविकास अधिकारी उपस्थित राहतील व पूर्ण क्षमतेने कामकाज करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याचे गट विकास अधिकारी यांनी सांगितले. अशी माहिती सरपंच पंकज दीक्षित यांनी दिली.