तांबवे गावातील बॅंक हलविण्याचा अधिकाऱ्यांचा घाट : लोकांच्यातून संताप
तांबवे गावात लोकांची सह्यांची मोहिम सुरू
कराड | विशाल वामनराव पाटील
तांबवे गावात 1980 साली आलेली बॅंक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) ही बॅंक केवळ अधिकाऱ्यांना कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी स्थलांतरित करायची आहे. गेल्या 45 वर्षापासून तांबवे (Tambave) गावासह परिसरात कार्यरत असणारी बॅंक 2-3 महिन्यापूर्वी आलेल्या शाखा अधिकारी मॅडमने हलविण्याचा घाट घातला आहे. परंतु, तांबवे ही स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असून गावातील व परिसरातील जवळपास 7 ते 8 गावांनी बॅंक स्थलांतरित करण्यास विरोध केला आहे. तरीही मॅडमची मनमानी सुरू असल्याने तांबवे गावातील सामान्य लोकांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे. बॅंक स्थलांतरित करू नये, यासाठी लोकांनी सह्यांची मोहिमही राबवली आहे.
तांबवेसह किरपे, आरेवाडी, गमेवाडी, साजूर, उत्तर तांबवे, दक्षिण तांबवे, पाठरवाडी या गावांसाठी ही बॅंक आहे. या गावाचे मध्य ठिकाण हे तांबवेच आहे. त्यामुळे बॅंक स्थलांतरित करण्यास विरोध उभा राहिला आहे. परंतु, केवळ आपल्याला वाटते म्हणून बॅंक हलविण्याचा घाट अधिकाऱ्यांनी घातला आहे. त्यामुळे आता शाखाप्रमुख यांनाच येथून बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथून हकलावे, असा मागणीचा सूर लोकांच्यातून उमटू लागला आहे. या बॅंकेत बचत गट, शेतकरी व उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांची खाती आहेत.
बॅंकेचा व्यवसाय वाढावा म्हणून बॅंकेचे अधिकारी प्रयत्न करायचे सोडून बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देत आहेत. ज्या ठिकाणी बॅंक स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जातो, तेथील लोकांनाही तांबवे हेच मध्य ठिकाण आहे. अशावेळी स्थलांतरित करण्यापेक्षा बॅंकेचे कार्यक्षेत्र वाढवावे म्हणजे व्यवसाय वाढेल. परंतु केवळ मी जिथे राहते, तिथेच घरातून बॅंकेचा कारभार पाहता यावा, म्हणून बॅंक स्थलांतरित करण्याचा घाट घातला जात आहे. लोकांच्या सेवेसाठी सोडून अधिकारी आपल्या फायद्यासाठी बॅंक स्थलांतरित करत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात कर्जदार, खातेदार यांना चुकीची वागणूक दिली जात आहे.
सहा महिने झाले कर्ज मिळेना अन् यांना व्यवसाय वाढवायचा आहे
गेल्या सहा महिन्यापूर्वी दिलेले बॅंक ऑफ महाराष्ट्र तांबवे शाखेत एक अडीच लाख रूपयांचे कर्ज प्रकरण अद्याप मंजूर झाले नाही. दररोज कर्जदाराला वेगवेगळी कागदपत्रे मागितली जात आहेत. एकाचवेळी सर्व कर्ज प्रक्रिया सांगितली जात नाही, हेलपाटे मारून कर्जदार आता म्हणू लागला की मला कर्जच नको. केवळ सहा महिन्यात माझा झालेला खर्च झालेला वेळ आणि पैसा परत करा. (बॅंक स्थलांतरित का करायची, वाचा उद्याच्या भागात)