तळबीडमध्ये मंदिरात चाकूने भोकसून एकाचा खून : एकाला अटक

कराड | तळबीड (ता. कराड) येथील एकाचा चाकूने भोसकून निर्दयपणे खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. गावच्या मारुती मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या ग्रामस्थांना हा प्रकार लक्षात आला होता. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी काही तासात संशयित मारेकऱ्यास पोलीसांंनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रात्री उशिरा पर्यंत या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू होती. किरकोळ कारणावरून झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. महेंद्र शंकर वाघमारे (वय- 45 रा. तळबीड, ता. कराड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी दिलीप मारुती साळुंखे (कोळी) (रा. तळबीड ता. कराड) या संशयित मारेकऱ्यास ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी तळबीड येथील श्रीराम मंदिराजवळ असणाऱ्या मारुती मंदिरात महेंद्र शंकर वाघमारे हे मृत अवस्थेत पडल्याचे तेथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना दिसून आले. त्यानंतर या घटनेची माहिती तळबीड पोलीस ठाण्यात देण्यात आली. तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळी तपासणी केली असता मृताच्या अंगावर रक्त व जखमा आढळून आल्या. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. महेंद्र वाघमारे यांच्या पोटामध्ये चाकूचे उर्मी घाव बसल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी काही तासात संशयितास ताब्यात घेतले आहे. मृत महेंद्र वाघमारे व संशयित साळुंखे यास दारुचे व्यसन होते. यातून झालेल्या वादातून राग मनात धरून दिलीप साळुंखे याने महेंद्र वाघमारे यांना दारू पाजून मारुती मंदिरात पोटात चाकूने भोसकून व गळा आवळून खुन केला. दरम्यान, येथे असणाऱ्या सीसीटीव्हीमुळे संशयतास पकडणे पोलिसांना सोपे गेले. संशयित हा दोन सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये मंदिरात जाताना व बाहेर पडताना दिसून आला आहे, असे सूत्राने सांगितले.
घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथक बोलावून तपास केला. श्वानने दोन वेळा संशयिताच्या घरापर्यंत माघ काढला असल्याचे सांगण्यात आले. खून झालेली व्यक्ती महेंद्र वाघमारे ही रोजंदारी करत असून त्यास दारूचे व्यसन होते. घरी आई-वडील असून पत्नी व मुलगी मुंबई येथे वास्तव्यास आहे. गेल्या दहा पंधरा वर्षांत दारुच्या व्यसनामुळे महेंद्र वाघमारे हे गावातील मंदिरात झोपत होते. तसेच संशयित मारेकरी दिलीप साळुंखे यासही दारूचे व्यसन लागले होते. व्यसनातूनच ही घटना घडल्याचे चर्चा गावांमध्ये आहे. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी भेट देऊन तपास केला. दरम्यान रात्री उशिरापर्यंत तळबीड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.