कराड शहरात पिस्तूल विक्रीस आलेल्या मसूरच्या एकाला अटक

कराड | विक्रीसाठी पिस्तूल घेऊन कराड शहरात आलेल्या संशयितस पोलिसांनी सापळा रचून अटक केली. कराड बसस्थानक परिसरातील हॉटेल कृष्णा पॅलेसजवळ डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या पथकाने शनिवार ही कारवाई केली. पोलिसांनी संशयताकडून एक पिस्तूल जप्त केले आहे.
शंकर बदु जाधव (वय- 25, रा. वाघेश्वर-मसूर, ता. कराड, जि. सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत माहिती देताना डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी सांगितले की, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. त्या अनुषंगाने विनापरवाना पिस्तूल घेऊन विक्रीसाठी एक जण कराड शहरात येणार असल्याची माहिती बातमीदारामार्फत डीवायएसपी अमोल ठाकूर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार केले. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रुचून कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने हॉटेल कृष्णा पॅलेस परिसरात दोन टीम तयार करून सापळा रचला. संशयित व्यक्ती परिसरात आल्याची खात्री होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल व मॅग्झिनमध्ये जिवंत राऊंड मिळून आले. पोलिसांनी संशयताला ताब्यात घेऊन अटक करत त्याच्या जवळील सुमारे 50 हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले. संशयित शंकर जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वाचक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पुजारी, सहाय्यक फौजदार अरुण दुबळे, पोलीस अंमलदार सागर बर्गे, असिफ जमादार, प्रवीण पवार, सचिन साळुंखे, सुधीर जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी कारवाईचे कौतुक केले.