‘आपले शेजारी खरे पहारेकरी’ संकल्पना : कराडचे अमोल ठाकूर यांनी पोलिस पाटलांना दिला कानमंत्र

कराड | कराड उपविभागातील पोलीस पाटीलांनी सतर्क रहायला हवे. एखादा गुन्हा घडण्यापुर्वी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांशी तातडीने संपर्क साधला पाहिजे. पोलीस पाटील यांनी आपल्या गावातील, भागातील लोकांना आपले शेजारी खरे पहारेकरी असतात, यांची कल्पना देवून संकल्पना राबवावी, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी दिली.
कराड शहर, ग्रामीण, उंब्रज, तळबीड, कोळे, उंडाळे, रेठरे, वडगाव व मसूर या सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची बैठक कराड अर्बन बॅंकेच्या सभागृहात पार पाडली. आपले शेजारी खरे पहारेकरी संकल्पनेतून पोलीस पाटील यांना सुचना करण्यात आल्या. यावेळी पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप सुर्यवंशी, पोलीस निरिक्षक विजय पाटील, उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत बधे, तळबीडचे राहूल वरूटे, कराड तालुका गावकामगार संघ अध्यक्ष प्रविणकुमार तिकवडे, राज्य एकीकरण समितीचे विजय पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील 198 पोलीस पाटील बैठकीला उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप सुर्यवंशी म्हणाले, कराड तालुका सधन व संवेदनशील आहे. कराड शहरात जे घडते त्याचे पडसाद आसपासच्या गावात उमटत असतात. अशा प्रसंगात पोलीस पाटील हे महत्त्वाची भुमिका बजावू शकतात. पोलीस पाटील यांनी सतर्क राहून गुन्हा किंवा अनुचित प्रकार घडण्यापुर्वी पोलिसांशी संपर्क साधला तर त्यावर नियंत्रण आणता येईल. पोलीस पाटील हे पोलीस प्रशासनाचे डोळे व कान आहेत. प्रत्येक पोलीस पाटील यांनी गावाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुर्यवंशी यांनी केले.
कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय पाटील म्हणाले, शहरासह प्रत्येक गावात नाकाबंदी महत्त्वाची असून हा उपक्रम राबवला आहे. बंद घरे चोरट्यांकडून टार्गेट केली जातात. अशा भागात पोलीस पाटील यांनी पोलिसांच्या मदतीने भेटी द्याव्यात. ग्रामसुरक्षा दल सतर्क झाले पाहिजे. आपला शेजारी हा खरा पहारेकरी ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी एकजुठीने प्रयत्न करावे असे आवाहन विजय पाटील यांनी केले. सुत्रसंचालन विजय पाटील यांनी केले. आभार सहाय्यक निरिक्षक राहूल वरूटे यांनी मानले.