पाटण परिवर्तनवादी : देसाई- पाटणकर कोणाच बालेकिल्ला नाहीच
पाटणकर- देसाई गटाने कोणी- कोणाची कधी जिरवली
(विशाल वामनराव पाटील)
पाटण विधानसभा मतदार संघ हा डोंगरदऱ्यात विस्तारलेला आहे. या मतदार संघात लोकनेते दाैलतराव (बाळासाहेब) देसाई, माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी नेतृत्व केले. या मतदार संघात 1980 पासून आजही अटीतटीची, गटातटाचे राजकारण पहायला मिळते. परंतु, पक्षीय ठेकू घेतल्याशिवाय विजय शक्य होत नाही, हेही तितकेच खरे आहे. विशेष ः म्हणजे पाटणकर आणि देसाई ही दोन्ही गट काॅंग्रेसच्या हात या चिन्हांवर निवडणूक लढलेले आहे. पाटण विधानसभा मतदार संघ परिवर्तवादी असून कोणत्याही एका गटाचा किंवा नेत्याचा राहिला नसल्याचे दिसत आहे.
पाटण मतदार संघात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा एकदाही पराभव झाला नसून 1972 साली 65 हजार 786 एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. 1972 चा विजय हाच पाटणमधील विधानसभेचा सर्वात मोठा विजय म्हणून आजही विक्रमी नोंद आहे. तर 2019 पर्यंत इतिहास पाहिला असता माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी सर्वाधिक 5 वेळा विजय मिळवला आहे. 1985 ते 2009 या काळात 2004 चा अपवाद वगळता विक्रमसिंह पाटणकर यांचे तालुक्यावर वर्चस्व होते. एकूण 11 पैकी 6 वेळा देसाई गट तर 5 वेळा पाटणकर गटाने या मतदार संघावर सत्ता मिळवली आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांची हॅट्ट्रीक
पाटणची पहिली विधानसभा निवडणूक 1972 साली दाैलतराव देसाई (काॅंग्रेस) यांना 66 हजार 857 मते तर विरोधातील रावसाहेब पाटणकर (पीडब्यूपी) यांना अवघे 1 हजार 71 मते मिळाली होती. 1978 साली दाैलतराव देसाई (जनता पक्ष)- 54 हजार 312 मते, भगवानराव देसाई (काॅंग्रेस आय)- 13 हजार 378 मते तर प्रतापराव जानुगडे (काॅंग्रेस यू)- 6 हजार 423 मते मिळाली होती. यावेळी दाैलतराव देसाई हे 40 हजार 934 मतांनी दुसऱ्यांदा विजयी झाले. 1980 सालची निवडणूक 6 हजार 823 मतांनी जिंकत दाैलतराव देसाई यांनी हॅट्ट्रीक केली. यावेळी पहिल्यांदा विक्रमसिंह पाटणकर काॅंग्रेस आय पक्षातून निवडणूकीला सामोरे गेले, तेव्हा त्यांना 33 हजार 660 मते मिळाली.
विक्रमसिंह पाटणकर यांचा विजयरथ
पाटण विधानसभा मतदार संघात 1985 नंतर माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा विजयरथ पहायला मिळाला. पहिल्या निवडणुकीत पराभव मिळाल्यानंतर दुसऱ्या 1985 च्या निवडणुकीत विक्रमसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांचे वडील काॅंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव देसाई यांचा 11 हजार 943 मतांनी पराभव केला. पुढे 1990 साली काॅंग्रेसने पाटणकरांना उमेदवारी दिल्याने विजयादेवी देसाई या अपक्ष निवडणूक रिंगणात उतरल्या. यावेळी मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट म्हणजे 22 हजार 644 मतांनी विजयादेवी देसाई यांचा पाटणकरांनी पराभव केला. त्यानंतर 1995 साली पहिल्यांदा शंभूराज देसाई (58, 663 मते) यांनी पाटणकरांच्या (59 हजार 399 मते) विरोधात अपक्ष निवडणूक रिंगणात शड्डू ठोकला. या निवडणुकीत अवघ्या 736 मतांनी विजय मिळवत पाटणकरांनी हॅट्ट्रीक मारली. पाटणकरांनी 1999 मध्ये 2 हजार 563 मतांनी विजय मिळवत चाैकार मारला. मात्र, यावेळी पाटण विधानसभा मतदार संघात पाटणकर (राष्ट्रवादी), देसाई (शिवसेना) अन् हिंदूराव पाटील काॅंग्रेसकडून लढले.
शंभूराज देसाईंचा पहिला विजय अन् तिसरा पराभव
पाटणच्या राजकारणात पाटणकर- देसाई ही पारंपारिक ठरू लागली. साहजिकच 2004 साली पुन्हा दोन्ही गट आमनेसामने आले. या निवडणुकीत शंभूराज देसाई पहिल्यांदा 5 हजार 851 एवढ्या मतांनी विजयी झाले. शंभूराज देसाईंना 72 हजार 214 तर पाटणकरांना 66 हजार 363 मते मिळाली होती. पुढे 2009 साली विधानसभा मतदार संघाची पुर्नरचना झाली अन् शंभूराज देसाईंना विक्रमसिंह पाटणकर यांच्या विरोधात तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी मनसेच्या अविनाश पाटील (2 हजार 61 मते) या उमेदवाराचा फटका शंभूराज देसाईंना बसला. पाटणकर अवघे 580 मतांनी विजयी झाले, यामध्ये मनसे फॅक्टरसह पोस्टल मतदारांनी शंभूराजेंना नाकारले होते.
पाटण अन् राज्यातील राजकारणात उलथापालथ
राज्याच्या राजकारणात आणि पाटणच्या राजकारणात गेल्या 10 वर्षात मोठ्या उलथापालथी झालेल्या दिसून आल्या. पाटणमध्ये 2014 साली तिरंगी लढत झाली. यावेळी 1999 ची पुनरावृत्ती होत देसाई (शिवसेना), सत्यजित पाटणकर (राष्ट्रवादी) आणि हिंदूराव पाटील काॅंग्रेसकडून लढले. यामध्ये शंभूराज देसाई यांनी 18 हजार 824 मतांनी विजय मिळवला. गेल्या 2019 च्या विधानसभेला सत्यजित पाटणकरांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. मात्र, आ. शंभूराज देसाईंचे विजयी मताधिक्य थोडे घसरले. त्यांनी 14 हजार 175 मतांनी विजय मिळवला. गेल्या पाच वर्षात महाविकास आणि महायुती असे सरकार राज्यात आले. यामध्ये महाविकास आघाडीत शंभूराज देसाईंना पहिल्यांदा गृहराज्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर राजकीय भूकंप झाला अन् शिवसेना फुटली. त्यामध्ये शंभूराज देसाई यांचा महत्वपूर्ण वाटा असल्याने त्यांनी महायुती सरकारमध्ये उत्पादन शुल्क मंत्री पदासह सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. आता 2024 च्या निवडणुकीत पाटणकर- देसाई गट पुन्हा आमनेसामने असणार असून विजय कोणाचा हे 23 नोव्हेंबरला कळेल.