Phaltan News : बंद बंगला फोडून 27 तोळे सोने, 3 किलो चांदीसह साडेबारा लाखांचा ऐवज लंपास
फलटण | कुटुंबासमेवत बाहेरगावी गेलेल्या एकाचा बंद बंगला चोरट्यांनी फोडला असल्याची घटना घडली. शहरातील लोकवस्तीमधील शुक्रवार पेठेतील बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी 27 तोळे सोन्याचे दागिने, तीन किलो चांदी व रोख 40 हजार रुपये असा एकूण साडेबारा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.
याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील मुधोजी महाविद्यालय रस्त्यावर दिलीप प्रभाकर फणसे यांचा बंगला आहे. मंगळवारी दि. 22 रोजी फणसे हे कुटुंबीयांसमवेत बाहेरगावी गेले होते. बंगल्यात कोणीच नसल्याने त्यांच्या बंद बंगल्याचे चोरट्याने कुलूप तोडून आतमधील तिजोरी व कपाटातील 27 तोळे सोन्याचे दागिने, तीन किलो चांदी व रोख 40 हजार रुपये असा एकूण साडेबारा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दि. 22 ऑगस्ट ते दि. 26 ऑगस्टच्या दरम्यानच्या कालावधीत ही चोरीची घटना घडली आहे. फणसे कुटुंबीय गावाहून आल्यानंतर प्रकार उघडकीस आला.
याबाबतची फिर्याद दिलीप फणसे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यानंतर पोलिसांनी ठसेतज्ञ व श्वान पथकास पाचारण केले; परंतु श्वान या परिसरातच घुटमळत राहिले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.