कराड आरटीओ व रोटरी क्लबकडून वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी

कराड | महाराष्ट्र शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियनांतर्गत उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, कराड आणि रोटरी क्लब, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय, कराड येथे वाहन चालकांच्या नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कराड आणि पाटण तालुक्यातील वाहन चालक व मालक संघटनानी तसेच मोटार वाहन चालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये 90 हुन अधिक वाहन चालकांची नेत्र आणि आरोग्य तपासणी करण्यात आली.
उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास रोटरी क्लब कराडचे अध्यक्ष बद्रिनाथ धस्के, डॉ. चंद्रशेखर कोगनोळकर, डॉ. राहुल फासे, डॉ. मनोज जोशी, डॉ. गजेंद्र पवार, रोटरीचे माजी सचिव चंद्रशेखर पाटील, विनायक राऊत, आणि आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, सुनील राजमाने, शिरीष पोकळे, सुरेश आगवणे, श्रीमती प्रसन्ना पवार, श्रीमती तृप्ती पाटील आणि सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हे उपस्थित होते.
रोटरी क्लबच्या डॉक्टरांनी उपस्थित वाहन चालकांना नियमित आरोग्य आणि नेत्र तपासणीचे महत्व विषद केले तर आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वाहन चालकांना रस्ता सुरक्षेमध्ये डोळ्यांच्या महत्वाबाबत मार्गदर्शन केले.
नेत्र तपासणीनंतर चालकांना मोफत चष्म्याचे वाटप रोटरी क्लबच्या पदाधिकारी आणि आरटीओ अधिकारी ह्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भारत गोरड यांनी वाहन चालकांना अग्निशमन उपकरणाच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखविले. सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक सागर विश्वासराव यांनी केले.



