कराडला ट्रॅव्हल्सवर पोलिसांचा कारवाईचा दंडुका

कराड । खासगी आराम बस जळून 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर घडली. या घटनेनंतर खबरदारी म्हणून कराडला डिवाएसपी अमोल ठाकूर यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी अचानक खासगी आरामबसची तपासणी सुरू केली. ज्या बसमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत, अशा बसवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. डिवायएसपी स्वतः कारवाईला उतरल्याने खासगी वाहनधारकांची चांगलीच तंतरली होती.
शनिवारची सकाळ महाराष्ट्रासाठी एक दुःखद घटना घेऊन उजाडली. समृद्धी महामार्गावर खासगी बसने पेट घेतला. या अपघातात 25 जण मृत्यूमुखी पडले. खासगी आरामबसचा अपघात झाल्यानंतर बसमध्ये पाळल्या जाणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा प्रश्न ऐरणीवर येतो. या अपघाताच्या पार्श्वभुमीवर शनिवारी पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी आरटीओ, वाहतूक नियंत्रण शाखा यांच्यासह कराडातील खासगी आरामबसच्या तपासणीची मोहिम हाती घेतली. कराड, पाटण तालुक्यातून अनेक खासगी बसेस पुणे, मुंबई, नाशिकसह राज्यासह राज्याबाहेर जात असतात. खासगी आरामबसची संख्या मोठी आहे. कोल्हापूर नाका, वारूंजी फाटा, उंब्रज, ढेबेवाडी, पाटण, कुंभारगांव, तारळे, उंडाळे, शेडगेवाडी या भागातून अंदाजे चारशेवर खासगी बसेस जात असतात.
या मार्गावरील अनेक खासगी बसेसमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना नसतात. बऱ्याच बसेसचे टायर हे कधी फुटतील अशा अवस्थेत असल्याची चर्चा पोलिसांच्या कानावर आली. त्यामुळे शनिवारी सायंकाळी पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी खासगी बसेसच्या तपासणीची मोहिम वेगाने राबवली. प्रत्येक बस तपासत त्यातील सुरक्षिततेची खात्री केली. सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नसलेल्या बसेसवर कारवाई करण्यात आली. काही बसेस पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या मालकांना यासंबधात समज देण्यात आली. प्रवाशांशीही डिवायएसपी अमोल ठाकूर यांनी संवाद साधत प्रवास करताना आपणही सुरक्षिततेबाबत सजग रहावे असे भावनिक आवाहन त्यांनी केले.