मसूरला पोलीस निरीक्षक अजय गोरड यांचा नागरी सत्कार : आमदार म्हणाले…

मसूर प्रतिनिधी| गजानन गिरी
उंब्रज पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात सपोनी अजय गोरड यांनी वेगळे नाते निर्माण केले, तसेच आपली कर्तबगारी उठावदारपणे दाखवली. अनेक उपक्रम राबवले. लोकाभिमुख कामाचा ठसा उमटवला. गावोगावी सीसीटीव्ही कॅमेराची संकल्पना राबवली. मसूर पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी श्री. गोरड यांचा पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला. गुन्हेगारीवर जरब बसवली असे काैतुकाचे उदगार माजी सहकार व पणनमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी काढले.
उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांची बदली कराड शहर पोलीस ठाण्यात झाल्याने त्यांच्या कर्तबगारीचा गौरव व्हावा. या विचारातून माजी सहकार व पणनमंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मसूरला नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, सातारा मध्यवर्ती बँकेचे संचालक लहुराज जाधव, सह्याद्री कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, संजय थोरात, माजी पंचायत समिती सदस्य डॉ विजय साळुंखे व अशोक संकपाळ, रमेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, ग्रामपंचायत सदस्या कौसल्या पाटोळे, वैशाली पाटोळे, कांचन पारवे, निलोफर मोमीन, निगडी विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय घोलप, रिसवड सोसायटीचे चेअरमन भिमराव घोलप, प्रमोद चव्हाण, विकास पाटोळे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
अजय गोरड म्हणाले, पोलीस ठाण्यात येणाऱ्या लोकांना सन्मानाची वागणूक देण्याचा प्रयत्न राहिला. गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी प्रयत्न केला. कोरोना काळात 15 लाख दंड वसुली झाली, ही वसुली गावोगावी लोकांसाठी चांगल्या कामासाठी दिली. 75 टक्के गावे सीसीटीव्ही कॅमेराखाली आणली. मसूर पोलीस ठाण्याच्या इमारतीचा पाठपुरावा केला. आजच्या नागरी सत्काराने आणखी चांगल्या कामासाठीची ऊर्जा मिळाली. मानसिंगराव जगदाळे, प्रशांत बधे, डॉ विजय साळुंखे, रमेश चव्हाण, सरपंच पंकज दीक्षित, कादर पिरजादे यांनीही मनोगत व्यक्त केले. रवी जाधव यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. शिकंदर शेख यांनी सूत्रसंचालन केले. पोलीस पाटील तिलोत्तमा वेल्हाळ यांनी आभार मानले.