वाईहून- साताऱ्याला निघालेला शेकडो मराठ्यांचा पायी मोर्चा पोलिसांनी रोखला
सातारा | वाईहून साताऱ्याला निघालेला मराठा समाजाचा पायी मोर्चा पोलिसांनी पुणे- बंगळुरू महामार्गावर पाचवड येथे प्रशासनाकडून अडविण्यात आला. जालना येथे मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ या पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आज सकाळी शेकडो कार्यकर्त्ये पायी निघालेले होते, त्यांना अडविण्यात आल्याने मोर्चेकरी, कार्यकर्ते आक्रमक झाले होते. याठिकाणी शासनाला निवेदन देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला.
दरम्यान, पुकारण्यात आलेल्या ‘वाई बंद’ला वाईकरांनी उस्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. मराठा क्रांती मोर्चाचा वाई ते सातारा पायी मोर्चा मराठा क्रांती मोर्चा संघटनेचा वाई ते सातारा पायी मोर्चा काढण्यात आला होता. रायरेश्वर वरून आलेल्या क्रांती ज्योतीचे स्वागत करून श्री महागणपती व श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्री महागणपतीची आरती करून गणपती घाटावरून सातारा कडे मोर्चास प्रारंभ झाला. वाई ते सातारा पायी मोर्चेचा मार्गदरम्यान, वाई ते सातारा पायी मोर्चेचा मार्ग गणपती घाट बावधन ओढा कडेगाव पाचवड उडतारे लिंबफाटा वाढे सदरबाजार जिल्हाधिकार्यालय असा आहे. या मार्गावरील सर्व गावातील मराठा बांधवानी सहभागी होऊन लाखोंच्या संख्यानी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले होते.
या मोर्चासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक कृष्णकांत पवार,सुधीर वाळुंज,बिपीन चव्हाण आदी अनेक अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या मोर्चात सर्व समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. वाई व्यापारी महासंघानेही वाई बंदचे आवाहन केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट होता.