सह्याद्री साखर कारखान्याला पावसाचा तडाखा : तीन कामगार जखमी
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
तुफानी चक्री वादळी वाऱ्याच्या तडाख्याने यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या नवीन विस्तारित प्रकल्पासह इतर प्रकल्पही उध्वस्त झाले. त्यात नवे शुगर हाऊस, बॉयलर इमारत, बारा साखर गोडाऊनचे पत्रे, अन्य कारखानाच्या प्रकल्पाचा, यंत्रणांचा, कारखान्याच्या प्रवेशद्वारावरची कमान आदीचा मोठ्या नुकसानीमध्ये समावेश आहे. सह्याद्री कारखान्याचे लाखों रुपयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कारखाना परिसरातील शंभर झाडे उन्मळून पडली आहेत. त्यात 25 नारळाच्या झाडांचा समावेश आहे. बॉयलर परिसरात वाऱ्याने उडालेला पत्रा लागून तीन कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. कारखाना परिसरासह शहापूरलाही वादळी वाऱ्याचा मोठा तडाका बसला आहे. अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दहा मिनिटाच्या वादळी वाऱ्याचा पावसाने अक्षरशः होत्याचे नव्हते झाले. आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याचा पावसास सुरुवात झाली. त्यात वाऱ्याचा प्रचंड वेग होता. त्यात चक्रीवादळ निर्माण झाल्याने सह्याद्री कारखान्यास मोठा तडाका बसला. प्रकल्प, यंत्रणा उध्वस्त झाली. प्रकल्पाचे मोठे जाडजुड लोखंडाचे साहित्य कॉलममधून उखडून पडले. उडालेले पत्रे झाडावर अडकून पडले.
वादळी वाऱ्याने नवीन विस्तारित प्रकल्पाचे उभारलेले कॉलम कैच्या उन्मळून पडले. कैच्या विज पुरवठा करणाऱ्या पॉवर केबलवर, स्टीम लाईनवर पडल्याने मोठी हानी झाली. नवीन उभारणी केलेल्या प्रतिदिनी एक लाख लिटर क्षमतेच्या डिस्टलरीच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले. नवे शुगर हाऊस आधुनिकीकरणाचे काम सुरू होते. या इमारतीवरील पत्रे, अँगल, स्लाइडिंग उडून पडले.बॉयलर इमारतीवर पत्रे उडाले. कॉलम उध्वस्त झाले. मुख्यता विस्तारवाढ प्रकल्पाचा हंगाम ऑक्टोबरला सुरू होणार होता. मात्र, या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे विस्तारवाढ लांबण्याची शक्यता आहे.