कोयना धरणात पाऊस : प्रसिध्द ओझर्डे धबधबा ओसंडून वाहू लागला
पाटण | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, कराड व पाटण तालुक्यात पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. तर कोयना धरण परिसरातील पश्चिम महाराष्ट्रात प्रसिध्द असलेला सातारा जिह्ल्यातील नवजाचा ओझर्डे धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. पाऊस सुरू झाल्याने कोयना धरणातून नदीपात्रात एक हजार 50 क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला आहे.
समुद्र सपाटीपासून 750 मीटर उंच असलेला ओझर्डे धबधबा
पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या परिसरातील समुद्रसपाटीपासून 750 मीटर उंची असलेला नवजा येथील ओझर्डे धबधबा ओसंडून वाहू लागल्याने वनविभाग आता सतर्क झाले आहे. या धबधब्याचे उगमस्थान तोरणा गाव येथे आहे. मान्सून पावसाचे आगमन झाल्याने निसर्गाच्या सहवासात 300 फूट उंचीवरून धबधब्याची लागलेली पाण्याची धार पहायला पर्यटक पश्चिम महाराष्ट्रातून येत असतात. गेले दोन वर्ष या भागात झालेल्या भूस्खलन व अति पावसामुळे पर्यटनाला फटका बसला होता. परंतु आता पुन्हा धबधबा वाहू लागल्याने पर्यटकांना हा धबधबा खुणावू लागला आहे.
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
जिल्ह्यात तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस कमी झाला आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस असला तरी पूर्वेकडे तो कमी होत गेलेला आहे. पश्चिम भागात भात व नाचणी पुर्नलागणी अगोदर मशागतीची कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहे. पावसाची उघडीप मिळाल्याने वापसा आला की शेतकरी खरिपाच्या पेरणीची कामे करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत कोयनानगर व नवजाला 56 मिलिमीटर व महाबळेश्वरला 94 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी 2029.10 फूट झाली असून, पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत असून, धरणाचा एकूण पाणीसाठा 10.95 टीएमसी झाला आहे. धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने 22 जून रोजी पायथा वीजगृहातून होणारा एक हजार 50 क्यूसेस विसर्ग बंद करण्यात आला होता. तो पुन्हा सुरू करण्यात आला असून, कोयना नदीपात्रात एक हजार 50 क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला आहे.