‘हॅलो न्यूज’चा दणका : वीजचोरी करणाऱ्या ठेकेदाराचे साहित्य जप्त, दंड न भरल्यास गुन्हा नोंद होणार

कराड | महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असून बांधकाम ठेकेदाराकडून दिवसाढवळ्या वीज चोरीचा प्रकार सुरू होता. चक्क महिनाभर वीजचोरी सुरू असताना ठेकेदारावर अधिकारी मेहेरबान का अशी बातमी ‘हॅलो न्यूज’ने लावली होती. या बातमीमुळे आता महावितरण कंपनीचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी संबधित बाधंकाम ठेकेदाराचे सर्व साहित्य जप्त केले आहे. तसेच वीज वितरण कंपनीने महामार्ग ठेकेदारास दंड व वापरलेले विजेचे बिल दिले आहे. ठेकेदाराने दोन दिवसात दंड व बिल न भरल्यास पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती वहागाव वीज केंद्राचे सहाय्यक अभियंता विशाल पवार यांनी दिली आहे.
वहागाव (ता. कराड) येथील एका डीपी वरून वीजेची चोरी करून महामार्ग ठेकेदाराकडून काम सुरू होते. दिवसाढवळ्या महामार्गावर वीज चोरी होत असताना वीज वितरण कडून दुर्लक्ष करण्यात आले. यावर ‘हॅलो न्यूज’ने कारवाईची मागणी करत वीज अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर वीज वितरण कंपनी खडबडून जागी झाली. वीज वितरणाच्या कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होत त्या महामार्ग ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करत दंड व वीजबिल दिले आहे.
माजी सभापती प्रणव ताटे यांचा इशारा
या सर्व प्रकाराबाबत माजी सभापती प्रणव ताटे यांनी अभियंता विशाल पवार यांची भेट घेवून ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली होती. कारवाई न झाल्यास महावितरणच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. परंतु महावितरणने केलेल्या कारवाईने समाधान व्यक्त केले. तसेच वीज वितरण कर्मचाऱ्याकडून सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक, अरेरावी आणि शेतकऱ्यांच्या विजबिलाबाबत चर्चा केली. यापुढे सर्वसामान्यांना जर वीज वितरण कंपनी कडून त्रास झाला तर नक्कीच आंदोलन करण्यात येईल असा, इशारा प्रणव ताटे यांनी दिला आहे.



