सातारा जिल्हा हादरला : सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात आढळले चौघांचे मृतदेह, पोलिसांनी सांगितले कारण…
कराड | पाटण तालुक्यातील सणबुर येथे गुरुवारी रात्री एकाच कुटुंबातील चार जण राहत्या घरी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण ढेबेवाडी विभाग हादरला आहे. या एकाच कुटुंबातील व्यक्तींची आत्महत्या की अन्य कारण याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून तपासाअंती त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. यामध्ये आनंदा पांडुरंग जाधव (वय- 75), पत्नी सुनंदा आनंदा जाधव (वय- 65), मुलगा संतोष आनंदा जाधव (वय- 45) व विवाहित मुलगी सौ.पुष्पलता प्रकाश धस (रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण) हे चार जण झोपलेले स्थितीत मयत आढळून आले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काही दिवसापासून आनंद जाधव हे आजारी होते. त्यांचे काही दिवसापासून उपचार सुरू होते. काल गुरुवारी त्यांना कृष्णा हॉस्पिटल कराड येथे हलवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांना तिथून घरी सोडण्यात आले. रात्री सणबुर येथील राहत्या घरी त्यांना ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली होती. लाईट नसलेमुळे जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. आजारी व्यक्ती सोबत पत्नी, मुलगा व मुलगी व ते स्वतः असे चौघेजण या ठिकाणी होते. विवाहित मुलगी पुष्पलता धस यांच्या मुलाने रात्री फोनवरून संपर्क साधून आजोबांच्या चौकशीची विचारपूस केली. सणबुर मधील घटना घडली ते घर एका आड बाजूला आहे. पुन्हा शुक्रवारी सकाळी त्याने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणी फोन उचलत नसल्याने शेजारील व्यक्तींना संपर्क करून घरी विचारपूस करण्यास सांगितले.
यावेळी काही लोक घरी गेले असता, त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून दरवाजा बंद होता व कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजाची कडी तोडून आत पाहिले. तेव्हा चारजण अंथरुणावर मृत अवस्थेत पडलेले दिसले. पोलीस पाटील राजेश सुतार यांनी ढेबेवाडी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांनी पोलिसांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या घटनांची पाहणी करून वरिष्ठांना याबाबत माहिती दिली या घटनेने संपूर्ण विभाग हादरला असून तपासानंतरच या घटनेचे कारण स्पष्ट होईल.
पोस्टमार्टमनंतर मृत्यूच कारण समजणार : पोलिस
आनंदा जाधव आजारी असल्याने त्यांना ऑक्सिजन लावा लागत असल्याने घरात रात्रभर जनरेटर सुरू होता. त्याचबरोबर घरात उंदीर मारण्यासाठी असणाऱ्या रेटॉल या औषधाची बाटली ही सापडून आली आहे. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात पाठवली असून पोस्टमार्टम नंतर मृत्यूच खरं कारण समजून येईल, अशी माहिती पाटण उपविभागीय अधिकारी विवेक लावंड यांनी दिली