बाप्पा गेले गावाला : कराडला 19 तासांनी मिरवणुका तर साऊंड सिस्टिम 12 च्या ठोक्यावर बंद

-विशाल वामनराव पाटील
कराड शहरातील कृष्णा- कोयना नदीच्या प्रीतीसंगम घाटावर गणेश भक्तांच्या अलोट गर्दीत 166 मंडळांनी गणपती बाप्पांना निरोप दिला. दरवर्षी प्रमाणे चालू वर्षीही वाठार हनुमान गणेश मंडळांने 2 वाजून 10 मिनिटांनी शेवटचा गणपती बाप्पांना निरोप दिला. तर पोलिसांनी बरोबर 12 वाजण्याच्या ठेक्यावर साऊंड सिस्टिम पूर्णपणे बंद केली. तब्बल 19 तासांनी गणपती विसर्जन मिरवणुका थांबल्या.
घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी सकाळी 7 वाजता कराडच्या कृष्णा- कोयना नदीच्या संगमावर सुरूवात झाली होती. अनेक मंडळांनी पोलिसांना सहकार्य करत आपल्या मंडळाचे गणपती बाप्पांना लवकर निरोप दिला. सकाळीपासून कराड पालिकेचे कर्मचारी आणि पोलिस यंत्रणा अलर्टवर असल्याचे दिसून आले. कराडचे तहसिलदार विजय पवार, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी, वाहतूक शाखेचे चेतन मछले, कराड नगरपालिकेचे कर्मचारी यांनी मोठी यंत्रणा राबवली.
शहरातील दत्त चाैक ते चावडी चाैक- कृष्णा घाटावर तसेच कन्या शाळा ते चावडी आणि कृष्णा घाट या मार्गावर गणेश मंडळाच्या वाहनांशिवाय कोणत्याही दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. चावडी चाैक येथे पालिकेने गणेश मंडळांचे स्वागत केले. यावेळी प्रत्येक गणेश मंडळास पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन म्हणून पालिकेकडून वृक्षाचे रोपटे व पानांचा विडा दिला जात होता. प्रत्येक मंडळ काही काळ या चावडी चाैकात थांबत असे. चावडी चाैकात गणेश मंडळांच्या मिरवणुका पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
कराडचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक
कराड पालिकेकडून गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी जलकुंड ठेवले जात असून यामध्ये हजारो मूर्ती विसर्जित केल्या जात आहेत. या जलकुंडामुळे नदीला होणारे प्रदूषण कमी करण्यास मदत होत आहे. तसेच प्रत्येक जलकुंड येथे ट्रॅक्टर- ट्राॅली उभी करून निर्माल्य गोळा केले जात आहे. तसेच नदीत कोणत्याही प्रकारचे निर्माल्य नेले जावू नये, यासाठी कर्मचारी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उभारली जात आहे. त्यामुळे कराडचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक होताना पहायला मिळत आहे.