विकास कामावरून श्रेयवाद : भाजपाच्या जिल्हाध्यक्षांसह 3 नेत्यांना राष्ट्रवादीचे जाहीर आव्हान

– विशाल वामनराव पाटील
कराड उत्तर मतदार संघातील भाजपाचे नेते मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ आणि नूतन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आपण विकासकामे आणल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून या विकासकामांबाबत कागदपत्रे घेवून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी कराडच्या दत्त चाैकात येण्याचे आव्हान भाजपाच्या तीन्ही नेत्यांना दिले आहे. त्यामुळे आता कराड उत्तर मतदार संघातील विकास कामांवरून चांगलाच श्रेयवाद रंगणार असल्याचे दिसत आहे.
कराड येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत माजी सहकार मंत्री व आमदार बाळासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे उपस्थित होते. यावेळी प्रशांत यादव म्हणाले, भाजपचे तीन नेते आपण विकासकामे आणल्याचा दावा करत आहेत. तेव्हा सदरील सर्व कामे आमचे नेते आमदार बाळासाहेब पाटील यांनी आणली असून खोटी प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेत्याचा आहे. आमच्याकडे पाठपुरावा केलेली तसेच मंजुरी आमदार साहेबांच्या शिफारशीने मिळाल्याची कागदपत्रे आहेत, तेव्हा तुम्ही कराड शहरातील दत्त चाैकात यावे, असे आव्हान मी देत आहे.
कराड उत्तरमधील भाजपाच्या नेत्याच्या विकासकामांवरील दाव्यामुळे आणि त्यावर राष्ट्रवादीने घेतलेल्या आक्षेपामुळे आता चांगलेच राजकारण तापणार असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी दिलेल्या आव्हानावर आता भाजपचे काय प्रत्युत्तर याकडे मतदार संघातील लोकांचे लक्ष असणार असून खरे कोण आणि खोटं कोण असा आरोप- प्रत्यारोपांचा सामना पहायला मिळणार आहे. तसेच भाजपचे नेते कागदपत्रे दाखवणार का आणि राष्ट्रवादीचे आव्हान स्विकारणार का असाही सवाल आता उपस्थित केला जाणार आहे.