क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

Satara News : सेवानिवृत्त अधिकाऱ्याला खोटा ई- मेल पाठवून 10 लाखाला गंडा

कराड । आयकर परताव्याबाबत खोटा ई-मेल पाठवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला आॅनलाइन पद्धतीने सुमारे 10 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याबाबत आगाशिवनगर-मलकापूर येथील उत्तमराव महादेव चव्हाण यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील उत्तमराव चव्हाण हे एका खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या बँक खात्यावर भविष्य निर्वाह निधीचे दहा लाख रुपये जमा झाले होते. दरम्यान, 8 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उत्तमराव चव्हाण यांच्या मेल आयडीवर आयकर परताव्याबाबत मेल आला. हा मेल वाचल्यानंतर परताव्याबाबत आयकर विभागाने माहिती मागविली असावी, असा उत्तमराव चव्हाण यांचा समज झाला. त्यावेळी उत्तमराव व त्यांच्या सुनेने मेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार एका आॅनलाईन फॉर्मवर बँक खात्याची माहिती तसेच इतर वैयक्तिक माहिती भरली. ही माहिती भरुन त्यांनी आॅनलाईन तो फॉर्म सबमीट केला. त्यानंतर अचानक आयकर संदर्भातील एक अ‍ॅप्लिकेशन उत्तमराव चव्हाण यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झाले. तसेच ‘चोवीस तासासाठी मोबाईल पडताळणीत राहील’, असा इंग्रजीमध्ये मेसेज आला.

आयकराबाबत आपण भरलेल्या माहितीची खातरजमा केली जात असावी, असा समज झाल्यामुळे उत्तमराव चव्हाण यांच्यासह कुटूंबियांनी या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तमराव यांनी त्यांचे बँक खाते तपासले असता त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या बँक खात्यातून आॅनलाईन पद्धतीने अज्ञाताने 9 लाख 93 हजार रुपये काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोन टप्प्यात हे पैसे काढण्यात आले होते. त्यामुळे उत्तमराव चव्हाण यांनी तातडीने बँकेत जाऊन याबाबत चौकशी केली. त्यावेळी अज्ञाताने आॅनलाईन पद्धतीने हे पैसे काढल्याचे त्यांना बँकेतून सांगण्यात आले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर उत्तमराव चव्हाण यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मारुती सराटे तपास करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker