Satara News : इनामदार वस्तीवर वृध्देला साडीने बांधून, मारहाण करत दरोडा

सातारा । पळशी स्टेशन (ता. कोरेगाव) येथील इनामदार वस्तीवर रात्री एकच्या सुमारास अज्ञात चार दरोडेखोरांनी एका वृद्धेस मारहाण करत दरोडा टाकला. यावेळी वृद्धेचे साडीने तोंड व हातपाय बांधून तिच्या अंगावरील व घरातील सुमारे 1 लाख 45 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आदी साहित्य दरोडेखोरांनी पळविले. याबाबत श्रीमती कांताबाई शंकर शिंदे (वय- 65, रा. पळशी, ता. कोरेगाव) असे या वृद्धेचे नाव असून मारहाणीत त्या जखमी झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी, की श्रीमती कांताबाई शिंदे या बुधवारी रात्री पळशी स्टेशन गावचे हद्दीत इनामदार वस्ती येथे घराच्या शेजारील शाळेच्या शेडमध्ये झोपलेल्या होत्या. रात्री एकच्या सुमारास कुत्री भुंकण्याचा आवाज आल्याने त्या जाग्या झाल्या. त्या वेळी त्यांना त्याच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसल्याने त्या घरात गेल्या. त्यांना घरात तोंड बांधलेले चार अनोळखी लोक घुसलेले दिसले. त्यातील दोघांनी कांताबाई यांना पकडले, तर अन्य दोघा चोरट्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी वृध्द महिलेचे हातपाय व तोंड साडीने बांधले व उजव्या हाताच्या तळहातावर धारदार शस्त्राने मारून जखमी करत कांताबाई यांच्या अंगावरील सोन्याची कर्णफुले, दोन मणीमंगळसूत्रे, तीन चमक्या, चेन, चांदीच्या पट्ट्या, नेकलेस, अंगठ्या, झुमके, जोडवी, तसेच एक घड्याळ, टीव्ही व रोख एक हजार रुपये असा सुमारे एक लाख 45 हजार 500 रुपयांचा ऐवज पळविला, तसेच घरमालक अन्सार हमला इनामदार यांच्या बंद घराच्या दरवाजास असलेला कोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातील लाकडी कपाटातील व गोदरेजच्या कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने घडयाळ, टीव्ही असे साहित्य चोरून नेले. अधिक तपास कोरेगाव पोलिस करत आहेत.