Satara News : सरपंच पदाच्या नादात अपहरण, मारामारी केल्याने 10 जणांवर गुन्हा
सातारा | बेकायदेशीर जमाव जमवून तुम्ही सरपंचपदाचा नाद सोडा, सरपंचपद पुन्हा मागितले, तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत एकास काठीने मारहाण केल्याप्रकरणी जांभूळणी (ता. माण) येथील सहा जणांविरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पाठोपाठच पुन्हा या घटनेत अपहरण करून मित्रास सरपंचपदाचा राजीनामा देण्यास सांग, या कारणावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणखी चौघांवर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की या घटनेतील फिर्यादी दत्तात्रय सायबू कोकरे (रा. जांभूळणी, ता. माण) हे काल सायंकाळी पाचच्या सुमारास गावातील पानटपरी नजीकच्या कट्ट्यावर बसले होते. तेव्हा नाथा भोजा काळेल, तानाजी सूर्यकांत काळेल, शहाजी तायाप्पा काळेल, बाबा कोंडिबा काळेल, सीताराम भगवान काळेल, तानाजी शिवाजी काळेल (सर्व रा. जांभुळणी, ता. माण) यांनी मला ‘काय रे लंगड्या तुला सरपंच व्हायचं हाय का? दुसरा कोणताही सदस्य बोलत नाही, तू कशाला बोलतोस, तुम्ही सरपंचपदाचा नाद सोडा, सरपंचपद पुन्हा मागितले, तर तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून सीताराम काळेल याने मला धरले व नाथा काळेल याने त्याचे हातातील काठी माझे पाठीत मारली. तेवढ्यात त्याठिकाणी असलेले इतरांनीही तुम्ही सरपंचपदाचा नाद सोडा, सरपंचपद पुन्हा मागितले, तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे दत्तात्रय कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार खाडे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत गाडीत जबरदस्तीने बसवून अपहरण करून तुझ्या मित्राला जांभळणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राजीनामा द्यायला सांग. अजून त्यांनी राजीनामा दिला नाही. तुला लय मस्ती आहे, असे म्हणून दत्तात्रय सायबू कोकरे यांना शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्वप्नील अशोक नरळे (रा. पानवण) व त्याच्यासोबत त्याचा एक मित्र गोसावी व इतर दोन अनोळखीविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत.