Satara News : दुबईत नोकरीच्या अमिषाने प्राचार्याने केली युवकाची फसवणूक
कराड । दुबईतील हॉटेलमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेल्या विद्यार्थ्याला 65 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी एका महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यासह त्याच्या पत्नीवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज संजय विश्वकर्मा (रा. शिंगण कॉलनी, लाहोटीनगर, मलकापूर) या विद्यार्थ्याने याबाबतची फिर्याद दिली आहे. सलील वसंत खोडे व शेफाली सलील खोडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापुरातील लाहोटीनगरमध्ये राहणाऱ्या सुरज विश्वकर्मा या विद्यार्थ्याने कराडातील एका हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. ज्यावेळी सुरज शिक्षण घेत होता, त्यावेळी सलील खोडे हे त्या महाविद्यालयात प्राचार्य होते. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सुरजला महाविद्यालयामार्फत इंटरर्नशिपसाठी कोल्हापुरच्या हॉटेलमध्ये पाठविण्यात आले. इंटर्नशिप झाल्यानंतर सुरज हा घरीच होता. त्याचदरम्यान प्राचार्य असलेल्या सलील खोडे यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. त्यामुळे त्यांनी समर्थ ओव्हरेस नावाचे प्लेसमेंटचे कार्यालय सुरू केले.
दरम्यान, नोव्हेंबर 2021 मध्ये सुरजला सलील खोडे यांनी फोन करुन दुबईतील हॉटेलमध्ये नोकरी करणार आहेस का, अशी विचारणा केली. सुरजने होकार दिल्यानंतर त्यासाठी त्यांनी 20 हजार रुपये प्रोसेसिंग फी भरण्यास सांगीतले. त्यानुसार सुरजने शेफाली खोडे यांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले. त्यानंतर पासपोर्ट आणि व्हिसासाठी 45 हजार रुपये घेतले. मात्र, पैसे घेऊनही त्या दोघांनी सुरजला नोकरीला लावले नाही. वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरज विश्वकर्मा याने याबाबतची फिर्याद कºहाड शहर पोलिसात दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.