Satara News : मित्राला वाचवायला गेलेल्यासह दोघांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू
सातारा | शहराजवळील दरे खुर्द गावच्या हद्दीत बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून दोघां मित्रांचा मृत्यू झाला. बंधाऱ्यात पोहण्यासाठी पाचजण गेले होते, त्यापैकी एकजण पोहायला उतरल्यानंतर बुडताना दिसल्याने दुसऱ्या मित्राने त्याला वाचविण्यासाठी उडी घेतली. परंतु, या घटनेत दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सुनील रामचंद्र मोरे (मूळ रा. कडवे, ता. पाटण. सध्या रा. जानकर काॅलनी दरे खुर्द) यांनी पोलिसांत खबर दिली आहे. तर स्वप्नील सुनील मोरे (वय- 15, रा. दरे खुर्द) आणि अमोल शंकर जांगळे (वय- 16, रा. चिपळूणकर बाग, मंगळवार पेठ सातारा) अशी मृत युवकांची नावे आहेत.
मंगळवारी दि. 15 आॅगस्ट रोजी दुपारी साडे बाराच्या नंतर हा प्रकार घडून आला. दरे खुर्द गावच्या हद्दीत जानकर काॅलनी येथे बंधारा आहे. या बंधाऱ्यात पाणी होते. या बंधाऱ्यातील पाण्यात काही मित्र पोहायला गेले होते. त्यावेळी स्वप्नील मोरे आणि अमोल जांगळे हेही बंधाऱ्यातील पाण्यात उतरले. पोहताना पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. सातारा तालुका पोलिस ठाण्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याबाबत नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चव्हाण हे अधिक माहिती घेत आहेत.