शिरगावच्या सख्ख्या बहिण- भावाची MPSC परिक्षेतून अभियंतापदी निवड
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2021 मध्ये शिरगाव (ता. कराड) येथील पृथ्वीराज प्रशांत पाटील व प्रियांका प्रशांत पाटील या सख्ख्या बहिण- भावाने महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता (राजपत्रित अधिकारी) म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई- वडिलांना दिले आहे.
दोघा बहिण- भावाने घरीच राहून एकत्र अभ्यास करून जिद्द व चिकाटीने हे यश संपादन केले आहे. त्यांना विद्यासागर अकॅडमीचे शिक्षक वर्ग, कार्यकारी अभियंता ओंकार शेंडुरे (जलसंपदा विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले. पृथ्वीराज व प्रियांका दोघांचे शालेय शिक्षण यशवंतराव चव्हाण विद्यालय, यशवंतनगर या ठिकाणी झाले.
पृथ्वीराज यांनी व्ही. जे. टी.आय. मुंबई मधून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बी. टेक. डिग्री संपादित केली आहे. प्रियांका यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक डिग्री संपादित केली आहे.