शिवसेना प्रमुखांचे ज्वलंत हिंदुत्व ठाकरे गट विसरला : मंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
भाजप- शिवसेनेची युती खुप जुनी आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी युती केली होती. ती युती मध्यंतरी सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी खंडित झाली होती. ती युती आम्ही पुढे नेली. तेव्हा आम्ही भाजपाची भाषा बोलतोय म्हणणं चुकीचे आहे. आम्हांला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेली हिंदुत्वाची भाषा बोलतोय. उलट तुम्ही ती भाषा विसरलाय. शिवसेना प्रमुखांचे ज्वलंत हिंदुत्व तुम्ही विसरला आहे. त्यामुळे आम्ही काय बोलतोय याच्यावर भाष्य करण्याचा अधिकारच तुम्हांला राहिला नाही. ज्याच्याविरूध्द आयुष्यभर शिवसेना प्रमुख राहिले, त्यांना जवळ घेणार नाही. त्याच्यासोबत जाणार नाही, म्हटले त्यांना तुम्ही मांडीवर घेवून बसला, असल्याची टीका ठाकरे गटावर मंत्री देसाई यांनी केली.
सातारा येथे माध्यमांशी बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत कशा पध्दतीने या अगोदर एकाच व्यक्तीला 300-300 आणि 500- 500 कोटीचे टेंडर दिली जात होती आणि त्यामध्ये बोगसगिरी झाल्याचा सगळा भांडाफोड मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहात केला आहे. या बोगस टेंडरला कोणाचा आशिर्वाद होता, कुणाच्या सांगण्यावरून होत होते हे सगळे समोर आलेलं आहे. सध्यास्थितीत मुंबई महापालिकेतील गैरकारभाराची एसआयटीकडून चाैकशी सुरू आहे. तेव्हा खोटारडं कोण आहे, कुणी महापालिकेला अोरबडण्याच काम केल तो सर्व प्रकार चाैकशीतून समोर येईल.
विश्वज्ञानी 8 च्या भोंग्याला येतात
संजय राऊत सकाळी 8 च्या भोंग्याला येतात आणि जे काही बोलतात त्यामध्ये कुणाबद्दल चांगल बोलेलं मला काही आठवत नाही. कुणावरती तरी टिका करायची, मी फार मोठा विश्वज्ञानी आहे अशा अविर्भावात दुसऱ्यावरती टीका करण्यापलिकड संजय राऊतांना काम नसत. नेहमीच तथ्यहीन बोलत असतात. तेव्हा अशा बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांनी कोणाला खोटारडं म्हणून नाहीतर काही म्हणून दे. आम्ही काम करणारी माणसं आहोत. गेल्या दीड वर्षात किती गतीने काम सुरू आहे, त्यामुळे आम्ही टीका करणाऱ्या संजय राऊतांना जास्त चांगल्या विकास कामांच्या माध्यमातून उत्तर देवू.